वस्तू , सेवांची निर्यात 900 अब्ज डॉलर्सपेक्षा होणार अधिक
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली अपेक्षा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक आर्थिक अनिश्चितता असूनही, 2025-26 मध्ये भारताची वस्तू आणि सेवांची निर्यात 900 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक होण्याची अपेक्षा आहे. रशिया-युक्रेन संघर्ष, इस्रायल-हमास युद्ध आणि लाल समुद्रातील संकटामुळे जागतिक आर्थिक अनिश्चितता असूनही, देशाची एकूण निर्यात 2023-24 मध्ये 778 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 2024-25 मध्ये 825 अब्ज डॉलर्सच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. भारतीय व्यापार प्रतिनिधी मंडळाला सांगितले की, ‘गेल्या आर्थिक वर्षात आम्ही 825 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा आकडा ओलांडला आहे. जागतिक उलथापालथीच्या काळात, चालू आर्थिक वर्षात आम्ही निर्यातीत 900 अब्ज डॉलर्सचा टप्पा निश्चितच ओलांडू.’ वाणिज्य आणि उद्योग मंत्री स्वीडनच्या अधिकृत दौऱ्यावर असताना मंत्री गोयल यांनी स्पष्ट केले आहे. या भेटीदरम्यान, ते दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूकीला चालना देण्यासाठी त्यांचे स्वीडिश समकक्ष आणि कंपनी प्रतिनिधींना भेटतील.
भारत क्यूसीओवर परस्पर फायदेशीर व्यवस्थेसाठी तयार आहे. गुणवत्ता मानकांशी संबंधित नियमांच्या अंमलबजावणीसाठी भारत आपल्या विश्वासू व्यापारी भागीदारांसोबत परस्पर फायदेशीर व्यवस्थेसाठी तयार आहे. त्यांनी सांगितले की, देशात दर्जेदार वस्तूंच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत गुणवत्ता नियंत्रण आदेश लागू करत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
देशांतर्गत आणि आयात केलेल्या वस्तूंसाठी नियम, मानके आणि प्रक्रिया समान आहेत आणि भारत देशांतर्गत उत्पादक आणि परदेशी पुरवठादारांमध्ये भेदभाव करत नाही. ते म्हणाले की, सर्व देशांतील कंपन्यांना समान वागणूक दिली जाते. परंतु निश्चितच नवीन उपाय शोधण्याची संधी असू शकते, जेणेकरून चांगल्या दर्जाची उत्पादने बनवणाऱ्या विश्वसनीय भागीदारांना अशा स्वीकृती सुलभ करण्याचे मार्ग शोधणे सोपे होईल,’. असेही मंत्री गोयल यांनी म्हटले.