बेंगळुरात बसस्थानकावर आढळली स्फोटके
जिलेटीनच्या कांड्या, डिटोनेटर जप्त : अधिक तपास सुरू
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरच्या कलासीपाळ्या येथील बसस्थानकावर स्फोटक साहित्य आढळून आल्याने बुधवारी बरीच खळबळ माजली. सदर स्फोटके पोलिसांनी जप्त केली असून संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. बेंगळूर शहर परिवहन मंडळाच्या (बीएमटीसी) सुरक्षा विभागाकडूनही माहिती जमा केली जात आहे.
सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कलासीपाळ्या येथील बसस्थानकावरील स्वच्छतागृहामध्ये एका बॅगेत जिलेटीनच्या कांड्या आणि डिटोनेटर आढळल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच डीसीपी एच. गिरीश यांच्या नेतृत्वाखाली पोलीस, श्वानपथक, बॉम्ब निकामी पथकाने बसस्थानकावर धाव घेत तपासणी केली. सीसीबीचे डीसीपी हिमाम कासीम यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. ही स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. बसस्थानकावरील स्वच्छतागृहात कोणी स्फोटके आणून ठेवली, याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. सदर प्रकरणासंबंधी कलासीपाळ्या पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
याविषयी बोलताना बेंगळूर पश्चिम विभागाचे डीसीपी गिरीश म्हणाले, 6 जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. स्फोटके असणारी बॅग घेऊन एक व्यक्ती बसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळली आहे. खडक फोडण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीने ही बॅग येथे ठेवल्याचा संशय आहे. जाणीवपूर्वक ही स्फोटके सोडून दिली की विसरून सोडली, याविषयी तपास केला जात आहे. जिलेटीनच्या कांड्यांशिवाय इतर कोणतीही स्फोटक साहित्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.