गेल्या आठवड्यापासून राज्यात थंडीमध्ये वाढ
बेंगळूर : गेल्या आठवड्यापासून राज्याभरात थंडीमध्ये वाढ झाली असून नागरिकांना थंड वाऱ्यांचा त्रास सहन करावा लागत आहेत. हवामानातील विसंगतीमुळे कल्याण कर्नाटकासह उत्तर कर्नाटक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट झाली आहे. हवामान खात्याने थंड वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे लोकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत आहे. रात्री गोठवणाऱ्या थंडीसोबतच सकाळी अनेक ठिकाणी धुके पडत आहे. तसेच वारंवार थंड वारे वाहत असल्यामुळे थंडी आणखी वाढत आहे. दिवसा उष्ण असला तरी थंड वाऱ्यांमुळे थंडी वाढत आहे. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बिदरमध्ये किमान तापमान 7.4 अंश सेल्सिअस होते. कारवारमध्ये कमाल तापमान 36.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. किनारपट्टीच्या प्रदेशात किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. तथापि, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले जात आहे. कमी-अधिक प्रमाणात अशीच हवामान परिस्थिती चार ते पाच दिवस कायम राहण्याची शक्मयता आहे. बेळगावमध्ये-12, विजापूर-10, धारवाड-9.5, गदग-10.6, कलबुर्गी-15, कोप्पळ-13.3, हावेरी-10.2, आगुंबे-9.3, बेंगळूर शहर-14.5, चित्रदुर्ग-14.9, दावणगेरे-9.0, हासन-8.7, मंड्या-11.2, म्हैसूरमध्ये 15.2 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.