बॉम्ब ठेवताना स्फोट, दहशतवादी ठार
पंजाबच्या अमृतसर येथील घटना : खलिस्तानी दहशतवादी संघटनेवर संशय
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाबच्या अमृतसर येथील मजीठा रोड बायपासवर मंगळवारी सकाळी सुमारे 9.30 वाजता मोठा स्फोट झाला. या स्फोटात एक इसम गंभीर जखमी झाला होता, ज्याचा नंतर मृत्यू झाला आहे. मृत इसम हा दहशतवादी संघटनेचा सदस्य होता, तो स्फोटक सामग्री पेरण्यासाठी तेथे आला होता, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक सतिंदर सिंह यांनी दिली आहे.
स्फोटाशी संबंधित केलेल्या प्रकरणांच्या तपासादरम्यान दहशतवादी स्फोटक सामग्री रिकामी जागेत ठेवायचे आणि मग अन्य इसम तेथून तो नेत हल्ला घडवून आणत होता असे आढळून आले होते. यावेळी देखील दहशतवादी स्फोटक सामग्री तेथून नेत असताना स्फोट झाला असण्याची शक्यता आहे. स्फोटात मारला गेलेला दहशतवादी बब्बर खालसाचा सक्रिय सदस्य असल्याचा संशय असून याप्रकरणी तपास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
स्फोटानंतर संबंधित इसमाचे हात-पायच तुटून पडले. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने परिसरातील लोकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तेथे धाव घेत तपास सुरू केला.