लंडन येथे अमेरिका दूतावासाजवळ स्फोट
वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटनची राजधानी लंडन येथील अमेरिकेच्या दूतावासानजीक स्फोट झाल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. हा स्फोट मोठा नव्हता, असे स्पष्टीकरण त्वरित देण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी अमेरिकेच्या दूतावासाजवळ संशयास्पद पाकीट आढळून आले होते. त्यानंतर बाँब निकामी करणाऱ्या दलाला पाचारण करण्यात आले. दूतावासानजीची वर्दळ काही काळ बंद ठेवण्यात आली होती.
या संशयास्पद पाकिटात स्फोटके असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही वेळातच त्याचा स्फोट झाला. हा स्फोट टायमर लावून करण्यात आला होता का, ही बाब अद्याप स्पष्ट व्हायची आहे. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दूतावासाजवळ आढळलेल्या पाकिटात स्फोटके आहेत हे स्पष्ट झाल्यानंतर स्फोटकविरोधी दलानेच या पाकिटाचा नियंत्रित स्फोट केला होता. तथापि या स्फोटासंबंधी निश्चित माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. पाकीट आढल्यानंतर सुरक्षा सैनिकांनी त्याच्या भोवती कडे करुन नागरीकांचे संरक्षण केले अशी माहिती देण्यात आली.
दक्षिण लंडनमध्येही संशयास्पद वस्तू
लंडन शहराच्या दक्षिण भागातील गॅटविक विमानतळानजीक संशयास्पद वस्तू आढळून आल्याने विमानतळ काही काळापुरता नागरीकांसाठी बंद करण्यात आला होता. तसेच तेथून सर्व नागरीकांना हटविण्यात आले होते. ससेक्स येथील पोलिसांनी ही माहिती देतानाच नागरीकांना सावधानतेचा इशाराही दिला होता.
रेल्वेस्थानकावर सुरक्षा व्यवस्था
स्फोटके सापडल्याच्या या दोन घटना पाहता गॅटविक विमानतळानजीकच्या रेल्वेस्थानकावरही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. या परिसरातील नागरीकांनी कोणत्याही संशयास्पद वस्तूस स्पर्श करु नये, अशी सूचना करण्यात आली होती. मात्र काहीकाळ संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले होते.