पाकिस्तानच्या कारखान्यात विस्फोट, 15 जणांचा मृत्यू
लाहोर :
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात शुक्रवारी एका रसायनांच्या कारखान्यात मोठी दुर्घटना घडली आहे. कारखान्यातील बॉयलरचा पहाटे स्फोट झाला. या स्फोटामुळे कारखान्याला आग लागण्यासोबत आसपासच्या इमारतीही कोसळल्या आहेत. या दुर्घटनेत कमीतकमी 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पंजाब प्रांतातील लाहोरपासून 130 किलोमीटर अंतरावरील मलिकपूर भागात ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
आतापर्यंत बचावपथकांनी ढिगाऱ्याखालून 15 मृतदेह बाहेर काढले आहेत. तर 7 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकून पडले असावेत अशी भीती आहे. बचाव पथक ढिगारा हटविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती फैसलाबादचे उपायुक्त राजा जहांगीर अन्वर यांनी दिली आहे. पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी रसायनांच्या कारखान्यातील दुर्घटनेत जीव गमावलेल्या लोकांच्या शोकाकुल परिवारांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच फैसलाबाद आयुक्तांकडून या दुर्घटनेविषयी विस्तृत अहवाल मागविला आहे.