फटाका कारखान्यात स्फोट, 7 ठार
वृत्तसंस्था / शिवकाशी
तामिळनाडू राज्यातील शिवकाशी नजीकच्या एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी असून त्यांच्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जखमींना विरुधुनगर येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. गेल्या वर्षीही याच भागात फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 10 जणांचा बळी गेला होता.
स्फोट कशामुळे झाला याचा तपास करण्यात येत आहे. कारखान्यात अग्निशमन सुविधा नव्हती. तसेच इतरही अनेक सुरक्षा नियमांचा भंग करण्यात येत होता, असा आरोप केला जात आहे. कारखान्यात वाजवी पेक्षा आणि अनुमतीपेक्षा अधिक प्रमाणात स्फोटक कच्चा माल साठविण्यात आला होता, असेही बोलले जात आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
शिवकाशीत नेहमीच धोका
फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन कामगारांचा बळी जाण्याच्या घटना नेहमीच घडतात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेही अनेकदा या भागाला भेट देऊन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, राज्य सरकारने मंडळाच्या सूचनांना गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे धोका कायम आहे. शिवकाशी परिसरात फटाके बनविणारे किमान 6 हजार लहान मोठे कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि आगरोधक यंत्रसामग्री आहे की नाही, याची वेळोवेळी पहाणी करणे आवश्यक असते. मात्र, हे काम केले जात नाही, असा आरोप केला जात आहे. या दुर्घटनेसंबंधी अनेक राजकीय पक्षांनीही दु:ख व्यक्त केले असून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.