इंडोनेशियात मशिदीत स्फोट, 54 जखमी
वृत्तसंस्था / जकार्ता
इंडोनेशिया या देशात एका शाळेच्या मशिदीत बॉम्बस्फोट घडविण्यात आला आहे. या स्फोटात 54 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह मशिदीत प्रार्थना करत असता, हा स्फोट घडविण्यात आला. या स्फोटामुळे मशिदीची इमारत हानीग्रस्त झाली. प्रार्थना करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर भिंत कोसळून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता या शहराच्या मध्यवस्तीत ही घटना घडली. त्यामुळे काही काळ या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या स्फोटाची जबाबदारी अद्यापपावेतो कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. तथापि, हे कृत्य दहशतवादी संघटनेचे आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हा स्फोट का घडविण्यात आला, याची कारणे शोधण्याचा आदेशही देण्यात आला.
3 गंभीर जखमी
या बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या अनेकांना प्राथमिक उपचार करून घरी जाऊ देण्यात आले आहे. 20 जणांवर अद्याप उपचार केले जात आहेत. त्यांच्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. बॉम्ब ठेवलेल्याचा शोध घेतला जात असून इंडोनेशिया सरकारने हल्ल्ल्याचा निषेध केला आहे.
