बिम्स हॉस्पिटलसाठी केएलई देणार तज्ञ डॉक्टर
दोन्ही संस्थांमध्ये महत्त्वाचा करार : आरोग्य सेवेला मिळणार आणखी बळ
बेळगाव : केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलने बेळगाव बिम्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसोबत अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देण्यासाठी एक महत्त्वाचा करार केला आहे. सदर करारावर मंगळवारी केएलई हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल एम. दयानंद आणि बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. केएलईच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि ग्रामीण भागातील लोकांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यासाठी बिम्स हॉस्पिटलशी हातमिळवणी केली आहे. बिम्स हॉस्पिटलच्या सहकार्याने या भागातील लोकांना मोफत उपचार देण्यासाठी उत्सुकता दर्शविली आहे. आधीच सुमारे 1400 बेडच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला पूर्णपणे मोफत उपचार दिले जात आहेत. यासह अधिकाधिक लोकांना सेवा देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.
यावेळी केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, बिम्सशी करार हा समाजसेवेच्या मूळ उद्देशाने करण्यात आला आहे. सर्वांना आरोग्यसेवा प्रदान करणे ही आमची इच्छा आहे. बिम्सचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण होऊन दोन वर्षे झाली तरीदेखील वैद्यकीय सेवा पुरविल्या जात नव्हत्या. त्यामुळे आम्ही सरकारला दोनदा आवाहन केले आणि गरीब जनतेला आरोग्य सुविधा, वैद्यकीय सेवा सुरू करण्याची विनंती केली. मात्र, सरकारने त्याला प्रतिसाद दिला नाही. शेवटी जेव्हा आम्ही स्वत: डॉक्टर उपलब्ध करून देऊन वैद्यकीय सेवा सुरू करू असे सांगितले तेव्हा सरकारने त्याला मान्यता दिली. त्यानुसार केवळ डॉक्टर सेवाच दिल्या जातील. त्यात सक्ती करण्याचा कोणताही हेतू नाही. बिम्स रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अधिक वैद्यकीय सेवांची आवश्यकता असेल तर त्यांना केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात पाठविले जाईल. या माध्यमातून रुग्णांना चांगले आणि सुधारित उपचार मिळतील, असे ते म्हणाले.
आमदार राजू सेठ म्हणाले, डॉ. प्रभाकर कोरे यांनी स्वत: सेवा देण्याचे मान्य केले आहे. ते डॉक्टर पाठवून गरीब रुग्णांना सेवा देणार आहेत. मोफत डॉक्टर पुरवून ते सेवा देतील. आरोग्य सेवेत ते एक पाऊल पुढे आहेत. एकंदरीत गरीब रुग्णांना दर्जेदार उपचार मिळतील. या करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होईल. यामुळे बेळगाव आणि आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक दर्जेदार आरोग्य सेवा सहज उपलब्ध होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी काहेरचे कुलगुरु डॉ. नितीन गंगाने, जे. एन. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. महांतशेट्टी, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. विश्वनाथ पट्टणशेट्टी, डॉ. राजेश पवार, डॉ. माधव प्रभू, डॉ. राजशेखर सोमशेट्टी, डॉ. बसवराज बिज्जर्गी, बिम्सचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. सिद्धू हुल्लोळी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इराण्णा पल्लेद आदी उपस्थित होते.
आयुष्मानद्वारे रुग्णांना मोफत उपचार
मुख्य म्हणजे न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, किडनी, हृदयरोग, हृदयशस्त्रक्रिया, गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी (पोट आणि आतड्यांचे आजार), बालरोग शस्त्रक्रिया आणि कर्करोग यांसारख्या सुपरस्पेशालिटी विभागांमधील कमतरता दूर करणे, तीव्र आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णालय पूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे आयुष्मान भारत योजनेंतर्गत रुग्णांना मोफत उपचार दिले जातील, असे डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले.