बेंगळुरातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी तज्ञ समिती स्थापन
बेंगळूर : बेंगळूरमधील वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पावले उचलली आहेत. यासाठी तज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे उपाध्यक्ष दिनेश गुळीगौडा यांनी दिली. सिलिकॉन शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळूरमधील वायू प्रदूषण धोकादायक पातळीपर्यंत वाढत असल्याबद्दल दिनेश गुळीगौडा यांनी खंत व्यक्त केली होती. याला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्र्यांनी सरकारच्या मुख्य सचिवांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्लीप्रमाणेच भविष्यात बेंगळूरला गंभीर प्रदूषण संकटाचा सामना करावा लागण्याची शक्मयता असल्याबद्दल दिनेश गुळीगौडा यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून तीव्र चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर डी. के. शिवकुमार यांनी मुख्य सचिवांमार्फत संबंधित खात्यांना बेंगळूरमध्ये वायू प्रदूषणाचा धोका रोखण्यास तातडीने मार्ग शोधण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.