खेलो इंडिया उपक्रमाच्या व्याप्तीत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी खेलो इंडिया उपक्रमाची व्याप्ती वाढवण्याची घोषणा केली असून या वर्षापासून शालेय खेळ, मार्शल आर्ट्स, बीच स्पोर्ट्स आणि जलक्रीडांसह अनेक खेळांचा समावेश त्यात करण्यात आला आहे.
‘खेलो इंडिया’चे वार्षिक वेळापत्रक सादर करताना मांडविया म्हणाले की, सरकार लवकरच खेलो इंडिया गेम्स आणि इतर स्पर्धांची मालिका सादर करेल, ज्यामध्ये खेलो इंडिया ईशान्य खेळांचा समावेश असेल. त्यांनी सांगितले की, यामागील उद्दिष्ट भारताची क्रीडा व्यवस्था मजबूत करणे आणि तळागाळातील स्पर्धांना चालना देण्यासाठी आणि प्रतिभा हुडकून काढण्यासाठी वर्षभराचे धोरणात्मक वेळापत्रक प्रदान करणे हे आहे.
‘खेलो इंडिया वार्षिक वेळापत्रक हे केवळ एक वेळापत्रक नाही, तर भारताला जागतिक क्रीडा महाशक्तीत रूपांतरित करण्याच्या दृष्टीने देशांतर्गत स्पर्धांच्या रचनेला बळकटी देणारा एक धोरणात्मक आराख्घ्डा आहे, असे मांडविया म्हणाले. गेल्या दशकात भारतीय खेळांमध्ये उल्लेखनीय परिवर्तन झाले आहे. आम्ही खेलो इंडिया उपक्रमांतर्गत नियमित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसह एक गतिमान आणि सर्वसमावेशक क्रीडा व्यवस्था तयार केली आहे. आम्ही लवकरच खेलो इंडिया बीच गेम्स, खेलो इंडिया स्कूल गेम्स, खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स आणि खेलो इंडिया नॉर्थ-ईस्ट गेम्स इत्यादी सादर करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
खेलो इंडिया मंचावर आधीच चार राष्ट्रीय स्पर्धांचा म्हणजे खेलो इंडिया यूथ गेम्स, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, खेलो इंडिया पॅरा गेम्स आणि खेलो इंडिया हिवाळी खेळ यांचा समावेश आहे. याशिवाय खेलो इंडिया मार्शल आर्ट गेम्स, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स आणि खेलो इंडिया स्वदेशी गेम्स यासारख्या कार्यक्रमांचा समावेश करण्यामागे स्थानिक आणि पारंपरिक मार्शल आर्ट्सना मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट आहे, असे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे.