बेळगावमधील रेल्वे-विमानसेवेचा विस्तार करा
चेंबर ऑफ कॉमर्सची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगावमधील विमान, रेल्वे, ईएसआय हॉस्पिटल, महामार्गांच्या समस्यांसाठी रविवारी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांची भेट बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी बेळगावच्या विकासासंदर्भात विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. शोभा करंदलाजे यांनीही विकासासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे रविवारी एका कार्यक्रमानिमित्त बेळगावमध्ये आल्या होत्या. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने त्यांची भेट घेण्यात आली. यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजीव कट्टीशेट्टी, संचालक संजय पोतदार, उदय जोशी, नागरमुन्नोळी, संदीप बागेवाडी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
चोर्ला-अनमोड रस्त्यासाठी 137 कोटी
बेळगावमध्ये खरेदीसाठी अधिकतर ग्राहक हे गोवा राज्यातून येतात. या ग्राहकांमुळे बेळगावच्या बाजारपेठेत लाखोंची उलाढाल होते. परंतु बेळगावहून गोव्याला ये-जा करण्यासाठीच्या चोर्ला व अनमोड घाट रस्त्याची पूर्णत: दुर्दशा झाल्याने याचा परिणाम व्यापारावर होत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी चोर्ला व अनमोड या दोन्ही रस्त्यांच्या विकासासाठी 137 कोटी रुपये मंजूर केले असून पावसाचे प्रमाण कमी होताच या कामाला सुरुवात होईल, असा विश्वास खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला.