For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे आजपासून प्रदर्शन

11:20 AM Aug 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे आजपासून प्रदर्शन
Advertisement

‘ओळख देशभक्तांची-शाळा तेथे क्रांतिमंदिर’ घोषवाक्यासह गावोगावी फिरणार : लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजन

Advertisement

बेळगाव : प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण करणे आवश्यक आहे. शालेय वयापासूनच राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले तर मुले देशाप्रती आपले कर्तव्य काय? हे समजून घेतील आणि एक सुदृढ, कणखर राष्ट्रनिर्मितीसाठी प्रयत्नशील राहतील. त्यासाठी त्यांना इतिहास समजावून देणे आवश्यक आहे. याच हेतूने देशभक्त कोषकार चंद्रकांत शहासने हे कार्यरत आहेत. ‘ओळख देशभक्तांची-शाळा तेथे क्रांतिमंदिर’ हे घोषवाक्य घेऊन ते गावोगावी क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवत आहेत. आर्थिक सक्षमतेबरोबरच राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी यांचा वारसा जोपासणाऱ्या लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान मराठा मंदिर येथे भरणार आहे. तर 4 सप्टेंबरपर्यंत विविध शाळा आणि ग्रंथालयांमध्ये हे प्रदर्शन भरणार आहे. यामध्ये दहा हजार क्रांतिकारकांची माहिती असलेला देशभक्त कोषसुद्धा पहायला मिळणार आहे.

चंद्रकांत शहासने मूळचे अलिबागचे. शाळेत एनसीसीमुळे त्यांच्यावर राष्ट्रभक्ती, देशप्रेम यांचे संस्कार झाले. आपल्या देशासाठी कोण लढले, कोणी त्याग केला? याबद्दलची उत्सुकता त्यांना वाचनापर्यंत घेऊन गेली. कॉलेजमधील सहकारी जेव्हा चित्रपट आणि क्रिकेट याबद्दलच्या बातम्या व फोटो संग्रह करत, तेव्हा हे दोन्ही परवडणारे नसल्याने चंद्रकांत यांनी स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो जमा करण्यास सुरुवात केली. त्यांना खरेतर सैन्यात दाखल व्हायचे होते. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे ते स्वप्न अपुरे राहिले. त्यामुळे 1980 मध्ये दारुबंदी उत्पादन शुल्क कार्यालयामध्ये ते रुजू झाले.

Advertisement

मात्र, मनातील वेगळे काही तरी करण्याची प्रेरणा स्वस्थ बसू देत नव्हती. आपण जमवलेल्या फोटोंचे माहितीसह त्यांनी छोट्या पुस्तिकेमध्ये रूपांतर केले आणि शालेय मुलांना ही पुस्तके मोफत दिली. 1979 मध्ये त्यांनी ‘कर्नाळा’ नावाचे पाक्षिक सुरू केले. परंतु, सरकारी नोकरीमुळे संपादक म्हणून वडिलांचे नाव लावले. एक वर्षानंतर तेही बंद झाले. मात्र, 1996 पासून ‘कर्नाळा’ त्रैमासिक सुरू केले. ज्यामध्ये क्रांतिकारकांची माहिती आणि त्यांचा ठळक फोटो प्रसिद्ध होत असे. विचारणा करूनही माहितीसाठी प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्वत:च लेखन सुरू केले. ‘कर्नाळा’ चॅरिटेबल ट्रस्टचीही त्यांनी स्थापना केली.

आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली व दहा हजार देशभक्तांची माहिती असणारा कोष तयार केला. क्रांतीदिनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते त्याचे प्रकाशनही झाले. दरम्यान, पुणे येथे हे प्रदर्शन भरविले असताना दररोज एक व्यक्ती प्रदर्शनाला भेट द्यायची. चंद्रकांत यांनी त्या व्यक्तीची माहिती विचारली आणि ते म्हणतात, किरण ठाकुर हे नाव माहिती होते. पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. माझ्या या सर्व खटाटोपामागे डॉ. किरण ठाकुर हिमालयाप्रमाणे उभे राहिले. त्यामुळे प्रदर्शनाचा उपक्रम मला निरंतर चालवता येत आहे. कौतुक अनेकांनी केले. पण राष्ट्रभक्तीसाठी बळ मात्र ‘लोकमान्य’ने दिले, असेही ते म्हणतात.

लोकमान्यतर्फेच त्यांना वाहन देण्यात आले असून त्या माध्यमातून ते सतत भ्रमंती करून ठिकठिकाणी प्रदर्शन भरवत आहेत. क्रांतिकारकांची माहिती संकलित करणे, त्याची पीडीएफ फाईल तयार करणे, प्रदर्शनाच्या ठिकाणी मांडणी करणे हे काही सोपे काम नाही. परंतु, अत्यंत चिकाटीने आणि ‘आलात तर सह नाहीतर शिवाय’ या धोरणाने शहासने कार्यरत आहेत. आपला हा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचावा, ही कळकळ डॉ. किरण ठाकुर यांनी लक्षात घेतली. त्यामुळे सर्वत्र हे प्रदर्शन पोहोचत असून विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये भर पडत आहे. बेळगावकरसुद्धा या प्रदर्शनाला प्रतिसाद देतील, असा विश्वास त्यांना वाटतो.

दररोज सकाळी 10 ते 8 या वेळेत प्रदर्शन खुले

बेळगावमध्ये दि. 15 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर दररोज सकाळी 10 ते 8 या वेळेत हे प्रदर्शन खुले आहे. 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान मराठा मंदिर, 20 व 21 आरपीडी किड्स लायब्ररी, 22 व 23 ज्ञान प्रबोधन मंदिर, 25 व 26 व्ही. वाय. चव्हाण पॉलिटेक्निक खानापूर, 28 व 30 सोमवार पेठ गणेश मंडळ, 1 व 2 सप्टेंबर बाबुराव ठाकुर पीयु कॉलेज जांबोटी, 3 व 4 सप्टेंबर कणकुंबी हायस्कूल, कणकुंबी येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.