For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केरळ चर्चकडून ‘केरला स्टोरी’चे प्रदर्शन

06:22 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
केरळ चर्चकडून ‘केरला स्टोरी’चे प्रदर्शन
Advertisement

वृत्तसंस्था/ कोची

Advertisement

केरळमधील प्रसिद्ध सिरो-मलबार चर्च संस्थेच्या इडुक्की शाखेकडून 10 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना ‘द केरला स्टोरी’ हा गाजलेला चित्रपट दाखविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ‘लव्ह जिहाद’ कारस्थानाची माहिती व्हावी यासाठी या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले होते, असे स्पष्टीकरण चर्चने दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सुटीतील कार्यक्रमांमध्ये या चित्रपटाचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपापसात आणि ज्येष्ठांशी या चित्रपटाविषयी चर्चा करावी आणि चित्रपटासंबंधी त्यांचे मतप्रदर्शन करावे, यासाठी तो त्यांना दाखविण्यात आला होता.

विद्यार्थ्यांचे प्रबोधक करण्यासाठी, तसेच त्यांना व्यवहारी जगात काय चालले आहे आणि त्यांनी कशाप्रकारे सावध राहिले पाहिजे, यासंबंधीची माहिती त्यांना मिळावी यासाठी हा चित्रपट निवडण्यात आला होता, अशी माहिती चर्चचे प्रमुख फादर जीन्स काराकट यांनी दिली. लव्ह जिहाद कशा प्रकारे केला जातो, पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांना, विशेषत: विद्यार्थिनींना त्यात कशाप्रकारे अडकविले जाते आणि नंतर त्यांचा दुरुपयोग कसा केला जातो, हे विद्यार्थ्यांना आधीच समजले पाहिजे. चर्चचा हा उपक्रम कोणत्याही धर्माविरोधात नाही. तथापि, समाजाने त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांपासून बोध घ्यावयास हवा, ही जाणीव निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न होता, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Advertisement

विरोधकांचा आक्षेप

या उपक्रमाला काही जणांनी विरोध केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित नाही. या चित्रपटात केरळची अवमानना करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविणे योग्य नव्हते. तथापी, इडुक्कीच्या चर्चने विरोधकांचा हा आक्षेप फेटाळला आहे.

भाजपचे समर्थन

इडुक्की चर्चच्या या उपक्रमाचे समर्थन केरळमधील भारतीय जनता पक्षाच्या शाखेने केले आहे. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट समाजाच्या सर्व घटकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. लव्ह जिहाद ही समस्या काल्पनिक नाही. अनेकांना याचा अनुभव आला असून अनेक तरुणींचे जीवन चुकीच्या संगतीने उद्ध्वस्त झाले आहे. लव्ह जिहाद ही वस्तुस्थिती असून तो एका व्यापक कारस्थानाचा भाग आहे. लव्ह जिहादच्या बळींची संख्या किती आहे, हा प्रश्न महत्त्वाचा नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षासह अनेक मान्यवरांनीही व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.