For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीओपी मूर्ती नियमावलीतून बेळगावला वगळा

11:24 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
पीओपी मूर्ती नियमावलीतून बेळगावला वगळा
Advertisement

मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने पालकमंत्र्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहरातील गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जातो. गणेश विसर्जनासाठी महानगरपालिकेतर्फे ठिकठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण केले जातात. त्यामुळे शहर व परिसरातील तलाव किंवा जलाशयातील पाण्याचे प्रदूषण होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी जे नियम घातले आहेत, त्यामध्ये बेळगाव शहराचा अपवाद करावा. अशा आशयाचे निवेदन मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पीओपी मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारने आदेश बजावला असून त्या अन्वयी पीओपी मूर्तीचे तलावात विसर्जन करून पाणी प्रदूषित करणे हा नियमभंग ठरणार आहे. परंतु बेळगाव शहरात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनातर्फे गेल्या कित्येक वर्षांपासून श्रीमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करून दिले जातात. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या स्त्राsताचे प्रदूषण होत नाही. याच कारणास्तव बेळगाव आणि शहर परिसरातील पीओपी मूर्ती विसर्जनाबाबतच्या नियमावलीतून बेळगाव शहराला वगळले जावे.

Advertisement

तसेच गणेशोत्सव शांततेने व उत्साहाने साजरा व्हावा यासाठी आपण पुढाकार घेऊन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची व गणेश महामंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. उत्सव शांततेने पार पाडण्यासाठी महामंडळ प्रशासनाला सर्व ते सहकार्य करेल, अशी ग्वाही निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. निवेदनावर महामंडळ अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, सचिव आनंद आपटेकर यांच्या सह्या आहेत. जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांना या निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.