For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन भावांचे मृतदेह सापडल्याने खळबळ

12:13 PM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन भावांचे मृतदेह सापडल्याने खळबळ
Advertisement

आई ही बेशुद्ध अवस्थेत सापडली : गोव्यातील पहिले भूक बळी प्रकरण,आंके - मडगाव येथील घटना

Advertisement

मडगाव : आकें-मडगाव येथील एका बंद फ्लॅटमध्ये दोन सख्ये भाऊ मृतावस्थेत सापडल्याने मडगाव शहरात खळबळ उडाली आहे. महम्मद जुबेर खान (29) व अल्ताफ खान (27) अशी या भावांची नावे आहेत. या दोघांना मृत्यू कसा आला याचे सध्या गूढ असले तरी उपाशी पोटी राहिल्यामुळे या दोघांना मृत्यू आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. उपलब्ध माहिती प्रमाणे, महम्मद जुबेर खान (29) व अल्ताफ खान (27) हे आकें परिसरातील एका फ्लॅटमध्ये आपली आई रूक्साना खान (54) हिच्यासोबत रहात होते. या तिघांची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा फ्लॅट बंद होता. काल जेव्हा बंद फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली, तेव्हा मडगाव पोलिसांना कल्पना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन फ्लॅटचा दरवाजा उघडला तेव्हा एका भाऊचा मृतदेह खाटीवर तर दुसऱ्या भाऊचा मृतदेह आईच्या जवळ आढळून आला. या दोन्ही भावांची आई बेशुद्धावस्थेत पोलिसांना आढळून आली. तिला त्वरित दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठवून देण्यात आले. तसेच दोन्ही मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आले असून उद्या शवचिकित्सा होण्याची शक्यता आहे.

गोव्यातील पहिले भूक बळी प्रकरण

Advertisement

दोन्ही भाऊ व आई यांची मानसिक स्थिती ठिक नव्हती. त्यात तिघांनी फ्लॅटमध्ये स्वत:ला बंदिस्त करून घेतले होते. बरेच दिवस उपाशीपोटी राहिल्याने दोन्ही भावांचा बळी गेला असवा अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.  घरात खाण्यासाठी काहीच नव्हते तसेच गॅस सिंलिडर देखील संपला होता. त्यामुळेच हे प्रकरण भूक बळी असावे अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, शवचिकित्सेनंतर या प्रकरणावर अधिक प्रकाश पडणार आहे.

महिना 17 हजार रूपये मिळत होते

या दोन्ही भावांना तसेच त्यांच्या आईला दर महिना 17 हजार रूपये मिळत होते अशी माहिती त्यांच्या वडिलाने पोलिसांनी दिली आहे. हे 17 हजार रूपये दुकाच्या भाड्यातून मिळत होते असेही त्यांनी सांगितले आहे. तरीसुद्धा हे भाऊ उपाशीपोटी राहिले. केवळ मानिसक आजारामुळे ते स्वत:ची काळजी घेऊ शकले नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुलांचा मृत्यू मात्र आई बेशुद्धा अवस्थेत

दोन सख्या भावांना मृत्यू आला तर आई बेशुद्धा अवस्थेत सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बेशुद्धवस्थेत सापडलेल्या आईला इस्पितळात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोघेही उच्चशिक्षित, मात्र...

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद जुबेर खान व अल्ताफ खान यांच्यातील एकाने सिव्हिल इंजिनिअरिंग, तर एकाने बी.कॉमचे शिक्षण घेतले होते. मोहम्मद जुबेर याचे लग्न झालेले होते, पण तो पत्नी व मुलांसोबत राहत नव्हता. तसेच त्यांच्या घरातून भांडणे झाल्याचेही आवाज अधूनमधून यायचे, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी मडगाव पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. मडगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.