अबकारी खात्याकडून 65 प्रकरणांतील अमलीपदार्थ नष्ट
बेळगाव : अबकारी खात्यातर्फे बेळगाव दक्षिण जिल्हा, धारवाड, विजापूर, बागलकोट या ठिकाणी जप्त करण्यात आलेले एकूण 34 प्रकरणांतील अमलीपदार्थ मंगळवार दि. 14 रोजी एस. व्ही. पी. केमिकल्स प्रा. लिमिटेड जांबोटी रोड, नावगे क्रॉस येथे नष्ट करण्यात आले. अबकारी खात्याच्यावतीने वर्षभरात गांजा, गांजाची झाडे, तंबाखू, हेरॉईन, हाशिश आदी प्रकारचे अमलीपदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले होते. बेळगाव दक्षिण जिल्हा अबकारी विभागाकडून 18, धारवाड जिल्हा 10, विजापूर जिल्हा 34, बागलकोट जिल्ह्यात 3 प्रकरणात मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते.
त्याचबरोबर पोलीस खात्याच्यावतीनेदेखील जप्त करण्यात आलेले अमलीपदार्थ अबकारी खात्याकडे वर्ग करण्यात आले होते. एकूण 65 प्रकरणांतील अमलीपदार्थ सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत ड्रग्ज डिस्पोजल कमिटीच्या सदस्य अबकारी उपायुक्त वनजाक्षी एम., बेळगाव उत्तर चिकोडी जिल्ह्याच्या अबकारी उपायुक्त स्वप्ना आर. एस., धारवाडचे अबकारी उपायुक्त रमेशकुमार एच., बागलकोटचे अबकारी उपायुक्त हनुमंतप्पा बजंत्री आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अमलीपदार्थ नष्ट करण्यात आले. यावेळी अबकारी खात्याचे सहआयुक्त एफ. एच. चलवादी, अबकारी अधीक्षक विजयकुमार हिरेमठ आदी उपस्थित होते.