जिल्हास्तरीय ‘प्रतिभाशोध’ला उत्तम प्रतिसाद
बेळगाव विभागातून 730, ‘चिकोडी’तून 839 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
बेळगाव : सरकारी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रतिभा शोध (टॅलंट सर्च) परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात आली आहे. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण खाते व जिल्हा शिक्षण-प्रशिक्षण संस्था (डाएट) बेळगावतर्फे 2025-26 मधील प्रतिभा शोध परीक्षा तीन टप्प्यात झाली. 6 नोव्हेंबर रोजी झालेल्या शालेय स्तरावरील या परीक्षेत एकूण 52,996 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. तालुका पातळीवरील स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेतून पहिल्या 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
18 नोव्हेंबर रोजी झालेल्या तालुकास्तरीय प्रतिभान्वेषण स्पर्धेनंतर जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रत्येक विभागातून पहिल्या 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये नववीतील 752 व दहावीतील 852 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. शुक्रवार दि. 28 रोजी जिल्हास्तरीय परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 1604 विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. यापैकी नववी वर्गातील 782 तर दहावी वर्गातील 787 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील नववी वर्गातील 363 व दहावी वर्गातील 367 अशा एकूण 730 विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली होती.
तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील नववी वर्गातील 419 व दहावी वर्गातील 420 अशा एकूण 839 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जिल्हास्तरावर परीक्षा दिलेल्या 100 विद्यार्थ्यांना सुवर्णसौधमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशन काळात मान्यवरांच्या हस्ते गैरविण्यात येणार आहे. तसेच प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे 25 हजार रु., 15 हजार रु., 10 हजार रु. अशी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.