नागरिकांचा विरोध झुगारून समर्थनगरमध्ये खोदाईला सुरुवात
बेळगाव : समर्थनगर येथील नागरिकांचा विरोध झुगारून जलवाहिनी घालण्यासाठी खोदाईचे काम सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्य मार्गावर खोदाई न करता अंतर्गत भागात खोदाई करून जलवाहिन्या घालाव्यात, अशी सूचना नागरिकांनी करूनदेखील एलअँडटी कंपनीकडून खोदाई सुरू ठेवण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरात सर्वत्र जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. मागील चार दिवसांपासून समर्थनगर येथे जलवाहिन्या घालण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. समर्थनगर येथील रस्ते अरुंद असल्यामुळे गणेशोत्सवात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मुख्य मार्गाऐवजी अंतर्गत भागातील रस्त्यांवर खोदाई करून जलवाहिन्या घालण्याची विनंती स्थानिकांनी आमदार असिफ सेठ व एलअँडटी अधिकाऱ्यांकडे केली होती.
एलअँडटीचा मनमानी कारभार
आमदारांनी सूचना करून देखील मुख्य मार्गावरील खोदाईचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे गणशोत्सवाच्या काळात वाहने ये-जा करणेही अवघड होणार आहे. या परिसरात प्रत्येकाच्या घरोघरी गणेशमूर्ती विराजमान होतात. त्यामुळे गणेशभक्तांना एलअँडटीच्या मनमानी कारभाराचा फटका बसणार आहे. त्यामुळे काम थांबविण्याची मागणी केली आहे.
आमदारांच्या सूचनेकडेही दुर्लक्ष
गणेशोत्सव काळात मुख्य मार्गावरील खोदाई करू नये, अशी विनंती आमदारांसह एलअँडटी अधिकाऱ्यांकडे केली होती. तरीदेखील खोदाई सुरू करण्यात आली आहे. यामुळे गणरायाच्या आगमनाला अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने अंतर्गत भागातील काम पूर्ण करून मगच मुख्य मार्गावरील काम करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
- संतोष कणेरी, स्थानिक नागरिक.