Solapur News: महापालिका, झेडपी अनू नगरपालिकांसाठी एकाच मशीनवर होणार मतदान
सोलापूर: आमागी महापालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकासाठी प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. या सर्व निवडणुकांसाठी एकच ईव्हीएम मशीन वापरण्याचे नियोजन निवडणूक यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकासाठी घेण्यात आलेले ईव्हीएम मशीन निवडणूक आयोगाकडे संग्रहित असते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी मशीन एकच मात्र मशीनमधील मेमरी चिफ वेगळी असते. केवळ मेमरी चिफ संग्रहित ठेवून ईव्हीएम मशीन पुन्हा पुढील निवडणुकीच्या मतदानासाठी वापरण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निश्चिती, आरक्षण निश्चिती झाली आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबर पूर्वी या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर महापालिका व नगरपालिका निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेसाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन पुन्हा वापरण्यात येणार आहे.
आमागी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी व दुरुस्तीचे कामही युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या महिनाभरानंतर पुढील किमान तीन महिने निवडणुकीची असणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रशासकीय यंत्रणा पुन्हा निवडणूक कामात व्यस्त होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्याने जिल्हा परिषदेला प्राप्त असलेला निधीही आचारसंहितेपूर्वी खर्च करण्याची लगभग जिल्हा परिषदेत सुरु झाली आहे. महापालिका व नगरपालिकाकडूनही निधी खर्चास वेग आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून यापूर्वीच जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांना आवश्यक सूचना देण्यात आले आहेत.
याशिवाय जिल्हाधिकारी यांच्यासमवेत निवडणूक आयोगाने बैठकही आयोजित केली आहे. त्यामुळे निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार हे स्पष्ट होत आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्राची पाहणी राजकीय लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. यावेळी प्रायोगिक तत्तावरही मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी ही लवकरच तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.