भाजपवरील वाढत्या विश्वासाचा पुरावा
महाराष्ट्रातील विजयावर सदानंद तानावडे यांचे मत
प्रतिनिधी/ पणजी
महाराष्ट्रात भाजपला मिळालेला उत्स्फूर्त जनादेश हा देशभरातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यायाने भाजपवर असलेल्या विश्वासाचा पुरावा आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद तानावडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना तानावडे बोलत होते. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी तब्बल 126 जागा एकट्या भाजपने जिंकल्या आहेत, तर एकूण 227 जागा भाजप आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामुळे देशभरात वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. त्याशिवाय झारखंडमध्येही गतवेळीपेक्षा यंदा भाजपच्या जागा वाढलेल्या आहेत. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जो देशवासियांचा विश्वास आहे तो वाढू लागला असल्याचे सिद्ध होत आहे, असे तानावडे यांनी पुढे सांगितले.
गोव्यात उमेदवारीबाबत आत्ताच बोलणे संयुक्तिक नाही
दरम्यान, गोव्यातील निवडणुकीसंदर्भात बोलताना त्यांनी अद्याप दोन-सव्वादोन वर्षे बाकी असताना आताच उमेदवारीबाबत बोलणे योग्य होणार नसल्याचे सांगितले. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. येथे उमेदवारीबाबत एक वेगळी पद्धती आहे. त्यामुळे कुणाला कोणत्या मतदारसंघात उमेदवारी मिळेल याबद्दल मंत्रीच नव्हे तर आमदारही सांगू शकत नाहीत. उमेदवारीबाबतचा विषय योग्यवेळी हाताळण्यात येईल, असे ते म्हणाले. आमदार मायकल लोबो यांनी पुढील निवडणूक मांद्रे मतदारसंघामधून लढणार असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. त्या पार्श्वभूमीवर तानावडे यांना सदर प्रश्न विचारण्यात आला होता.