‘जॉब स्कॅम’प्रकरणी काँग्रेसचे आंदोलन
निष्पक्ष न्यायिक आयोगाची स्थापना करण्याची मागणी
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या ‘जॉब स्कॅम’प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काल शनिवारी येथील आझाद मैदानावर आंदोलन छेडले. निष्पक्ष न्यायिक आयोगाची स्थापना करुन प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा, अशी मागणी करीत राजधानीत मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस कार्यकत्यांना पोलिसांनी घेरले. गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. नंतर संध्यकाळी उशिरा त्यांची सुटका केली.
गोवा पोलिस हे मुख्यमंत्र्यांच्या हातातील बाहुले आहेत त्यामुळे ‘जॉब स्कॅम’ प्रकरणातील संशयितांवर योग्यती कारवाई होत नाही. संशयितांना अटक होते मात्र अवघ्या काही दिवसातच त्यांची जामिनावर सुटका होते. एक प्रकारे संशयितांना पोलिस मुद्दामहून मोकळीक देण्याचा प्रयत्न करीत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे अमित पाटकर म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजीनामा द्यावा आणि निष्पक्ष न्यायिक आयोगाची स्थापना करुन ‘जॉब स्कॅम’ प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी पाटकर यांनी केली आहे.
भाजप सरकार गोव्यातील तऊणांशी खेळत आहे. या घोटाळ्dयात भाजपचे मंत्री, पदाधिकारी सहभागी आहेत म्हणूनच तपास काम रखडत आहे, असा आरोपही पाटकर यांनी केला. सरकारमधील सध्याच्या रिक्त पदांवर श्वेतपत्रिका काढण्याची आणि न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती करण्याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले पाहिजे, असेही पाटकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीला सरकारी नोकरीसाठी रोख 5 लाख रु. एका आरोपीला दिल्याचेही उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जॉब स्कॅम’ प्रकरणात आतापर्यंत राज्यभरात 40 हून अधिक तक्रारी नोंद झाल्या आहे. याप्रकरणी 20 हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.
खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी, ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळा हा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील संस्थात्मक भ्रष्टाचाराचा एक प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.
आंदोलनात काँग्रेसच्या आमदारांची दांडी
काँग्रेसने ‘जॉब स्कॅम’ प्रकरणी आझाद मैदानावर आंदोलन केले खरे मात्र काँग्रेसच्या आमदारांनीच आंदोलनापासून दांडी मारल्याने प्रश्न उपस्थित झाला आहे. पक्षासाठी झटणारे कार्यकर्ते आपला कामधंदा सोडून आंदोलनासाठी उपस्थित राहतात आणि स्वत:ला नेते म्हणवणारे आमदार आंदोलनापासून दूर राहतात त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन आमदारांनी 11 वाजेपर्यंत आंदोलनाच्या ठिकाणी पोहचण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आगशी पोलिस स्थानकात नेले तरी काँग्रेसचे दोन्ही आमदार फिरकलेच नाही.