For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय फुटबॉलचा ‘सबकुछ’...सुनील छेत्री !

06:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय फुटबॉलचा ‘सबकुछ’   सुनील छेत्री
Advertisement

भारतीय फुटबॉल म्हटल्यानंतर मागील दशकभरात नाव समोर यायचं ते सुनील छेत्रीचंच....राष्ट्रीय संघातील आघाडीपटू नि कर्णधार म्हणून त्याची  कामगिरी राहिली ती त्यास साजेशीच...आता अनेक वर्षं हा भार वाहिल्यानंतर छेत्रीनं अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतलाय. आपल्याकडील फुटबॉलच्या विश्वातील एका देदिप्यमान पर्वावर त्यामुळं पडदा पडलाय...रविवार 12 जून, 2005...स्थळ : क्वेट्टा, पाकिस्तान...19 वर्षांच्या त्या खेळाडूला भारतीय प्रशिक्षक सुखविंदर सिंग यांनी तो वरिष्ठ संघाचं प्रतिनिधीत्व करणार असं जेव्हा सांगितलं तेव्हा त्याला आनंदानं अक्षरश: वेड लागण्याची पाळी आली...मग कारकिर्दीतील पहिल्याच लढतीत गोल नोंदवून त्यानं 20 हजार पक्षपाती पाकिस्तान्यांची तोंडं बंद केली. त्यापूर्वी त्यानं ‘सॅफ’ स्पर्धेत भारताच्या 23 वर्षांखालील संघाचं इस्लामाबादेत प्रतिनिधीत्व केलं होतं...त्यानंतर हा प्रवास तब्बल 19 वर्षं, 150 लढती आणि 94 गोल असा चालला..16 मे, 2024...त्या 39 वर्षीय अफलातून भारतीय कर्णधारानं आपला जिवलग मित्र नि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीशी सखोल चर्चा करून निवृत्त होण्याचा निर्णय समाजमाध्यमांवर जाहीर केला.... भारताच्या त्या अत्यंत अनुभवी फुटबॉलपटूनं मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय गोलांची नोंद केलेली असली, तरी त्याच्या काही फटक्यांना टीकाकार, या खेळातील तज्ञ अजूनही विसरलेले नाहीत...उदाहरणार्थ मैदानावरील प्रतिस्पर्ध्यांना चकवत किरगिज प्रजासत्ताकच्या गोलरक्षकाला दिलेला दणका, केनियाच्या गोलरक्षकाच्या डोक्यावरून अलगद फटकावलेला चेंडू, म्यानमारविरुद्धची कोंडी फोडणारी ‘स्ट्राईक’ नि ओमानच्या गोलरक्षकाला फसविणारी व रॉकेटच्या गतीनं गेलेली ‘फ्री-कीक’...सुनील छेत्री !

Advertisement

जिगरबाज छेत्री आपल्या जीवनातील शेवटचा सामना खेळणार तो कोलकात्यात कुवेतविरुद्ध...‘फिफा विश्वचषक पात्रता फेरी’तील त्या लढतीत जर भारतानं विजय मिळविला, तर प्रथमच आपला देश तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरेल...त्याच्या निर्णयानं अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असल्या, तरी त्यात फारसं आश्चर्य मात्र अजिबात लपलेलं नव्हतं. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून सुनील छेत्रीनं निवृत्तीचा निर्णय जाहीर करावा असा मतप्रवाह वाढत चालला होता. त्याची गोल नोंदविण्याची क्षमता आटत चालली होती. त्यानं देशातर्फे शेवटचा मैदानी गोल नोंदविला तो मलेशियाविरुद्ध मागील ऑक्टोबर महिन्यात. त्यानंतर ‘एएफसी एशिया कप’सह सहा आंतरराष्ट्रीय लढतींत त्याला एकही गोल करणं जमलं नव्हतं...छेत्रीच्या मनात निवृत्तीचे विचार बळावू लागले ते अफगाणिस्तानविरुद्ध धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर...

असा हा खेळाडू कोलकात्यातील सॉल्ट लेकवर शेवटची लढत खेळण्यासाठी उतरेल तेव्हा दर्शकांच्या मनात भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील असंख्य प्रसंग जमा होतील...सध्याच्या आणि पुढच्या पिढीतील खेळाडूंसाठी देखील सुनील छेत्रीची जागा भरून काढणं हे आव्हान सोपं जाणार नाहीये. अर्थात संघात असे काही खेळाडू निश्चितच आहेत की, जे कर्णधार म्हणून त्याचा वारसा चालविण्यास सक्षम दिसतात. ही जबाबदारी त्यानं 2011 पासून अभिमानानं पेललीय. तथापि छेत्रीच्या मैदानाबाहेर जाण्यानं सर्वांत मोठी पोकळी निर्माण होईल ती आघाडीफळीत....2005 मध्ये पदार्पण केल्यापासून सुनीलनं क्रिकेटला धर्म मानणाऱ्या या देशात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करताना आघाडीफळीवर अविट छाप सोडली. त्याच्या या स्थानाला आव्हान देणं तो खेळत असताना कुणालाही जमलं नाही. अनेक ‘स्ट्रायकर्स’ आले व गेले, परंतु छेत्री ज्या प्रभावीपणे, ज्या उत्साहानं कार्यरत राहिला तशा पद्धतीनं कुणीही यशस्वी झालं नाही...

Advertisement

असे खेळाडू तयार व्हायला हवेत ते क्लबस्तरावर. पण तिथं नजर टाकल्यास काही फारसं आशादायी चित्र दिसत नाही...मागील काही दशकांपासून प्रमुख क्लब्सनी मुख्य आघाडीपटू म्हणून जबाबदारी सोपविणं पसंत केलंय ते परदेशी खेळाडूंवर. त्यामुळं नवोदित भारतीय आघाडीपटूंवर पाळी आलीय ती दुय्यम भूमिका बजावण्याची किंवा ‘विंगर’ म्हणून खेळण्याची...बऱ्याच वर्षांपूर्वी भारतीय आघाडीपटू म्हणून छाप उमटविली होती ती आय. एम. विजयननं. त्यानंतर उगवला तो दिग्गज बायचुंग भूतिया. भूतियानंतर कोण असा प्रश्न निर्माण होईस्तोवर सुनील छेत्रीचा उदय झाला.... छेत्रीचा वारसा कोण चालविणार असा प्रश्न बऱ्याच काळापासून विचारला जातोय. त्यावर खुद्द सुनील म्हणतो, ‘मला भारतीय फुटबॉल संघाच्या भविष्यासंबंधी बऱ्याच आशा आहेत. विविध स्थानांसाठी जोरदार चुरस असली, तरी आघाडीपटूंचा विचार केल्यास माझ्या डोळ्यांसमोर येतात ते लिस्टन कुलासो, मनवीर सिंग, बिपीन सिंग, विक्रम प्रताप सिंह, छांगटे, अनिरुद्ध थापा नि साहाल अब्दुल समदसारखे खेळाडू’....खुद्द छेत्रीची भविष्यात काय भूमिका राहील हा सुद्धा उत्सुकतेचा विषय बनलाय. त्याअनुषंगानं, खास करून प्रशिक्षकपद स्वीकारण्यासंबंधी तो सांगतो, ‘खेळाचं ज्ञान वाढविण्यासाठी प्रशिक्षकपदाचा परवाना मिळविणं मला आवडेल. पण सुंदर दिसणाऱ्या विविध प्रशिक्षकांची अतिताणामुळं केवळ एका वर्षात झालेली परिस्थिती मी पाहिलीय अन् त्यामुळं सध्या तरी प्रशिक्षक व्हायचा विचार नाही’... सुनील छेत्रीकडे विलक्षण चिवट मानसिकता राहिलीय आणि सतत लढण्याचा निर्धारही. त्यानं आपल्या संघासाठी नेहमी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु राष्ट्रीय संघात मुख्य ‘स्ट्रायकर’ म्हणून छेत्रीचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी राहिला तो कोणी नवीन खेळाडू नव्हे, तर झपाट्यानं सरणारा वेळ...सुनीलनं निवृत्ती जाहीर केलेली असली, तरी ‘इंडियन सुपर लीग’मध्ये ‘एफसी बेंगळूर’तर्फे खेळताना किमान वर्षभर त्याचं दर्शन घडेल !

थोडक्यात भारताचा दिग्गज कर्णधार...

  • जन्म : 3 ऑगस्ट, 1984 सिकंदराबाद इथं...
  • मैदानावरील खेळण्याची जागा : आघाडीपटू...
  • भारतातर्फे पदार्पण : 12 जून, 2005 रोजी क्वेट्टा इथं पाकिस्तानविरुद्ध...
  • भारतातर्फे कारकीर्द : एकूण 150 लढती व त्यापैकी 87 सामन्यांत कर्णधारपदाची भूमिका...
  • व्यावसायिक खेळाडू या नात्याने पहिला करार : 2002 साली 17 व्या वर्षी मोहन बगानशी (त्यावेळी त्याचे प्रशिक्षक होते सुब्रत भट्टाचार्य...4 डिसेंबर, 2017 रोजी त्यांचीच मुलगी सोनम हिच्याशी लग्न)...

मिळालेले सन्मान...

  • पद्मश्री (2019), खेलरत्न (2021), अर्जुन पुरस्कार (2011), एएफसीचा ‘एशियन आयकॉन’ सन्मान (2018)
  • भारतीय फुटबॉल महासंघाकडून 2007, 2011, 2013, 2014, 2017 आणि 2019 साली देशाली सर्वोत्तम खेळाडू म्हणून निंवड....
  • इंटरकॉन्टिनेन्टल करंडक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू (2018)
  • एफपीएआय खेळाडू म्हणून निवड (2009 व 2018)...
  • एएफसी चॅलेंज चषक एमव्हीपी (2008)...
  • सॅफ एमव्हीपी (2011)...

अफलातून कारकीर्द...

  • भारतातर्फे 50 आंतरराष्ट्रीय गोलांची नोंद करणारा पहिलावहिला खेळाडू...
  • एकूण 94 आंतरराष्ट्रीय गोलांची नोंद...
  • सध्या खेळत असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो (128)  लायोनेल मेस्सी (106) यांच्यानंतर तिसरं स्थान, तर विश्वातील सर्व खेळाडूंचा विचार केल्यास पाचवा क्रमांक...
  • सॅफ चषक स्पर्धेच्या तीन अंतिम फेऱ्यांत (2011, 2015-16, 2021) गोलांची नोंद...
  • भारतातर्फे खेळताना एकूण चार हॅट्ट्रिक्स...
  • कारकिर्दीतील पहिल्या, 50 व्या, 100 व्या अन् 150 व्या सामन्यात प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकविणारा एकमेव भारतीय...

जिंकलेले चषक...

  • नेहरू चषक स्पर्धा (2007, 2009 व 2012)
  • एएफसी चॅलेंज चषक (2008)
  • सॅफ करंडक (2011, 2015, 2021 व 2023)
  • हीरो इंटरकॉन्टिनेन्टल कप (2018 व 2023)

क्लबस्तरावर वाटचाल...

  • सुनील छेत्रीचा क्लब फुटबॉलमधील प्रवास सुरू झाला तो 2001 ते 2002 दरम्यान दिल्लीतील सिटी क्लबमधून...पुढं मोहन बागाननं त्याच्यातील गुण ओळखून त्याला करारबद्ध केलं. त्यानंतर त्यानं मागं वळून पाहिलं नाही. छेत्रीचं योग्य वेळी योग्य ठिकाणी राहण्याचं कौशल्य आणि गोल करण्याची क्षमता यामुळं पुढं तो जेसीटी, ईस्ट बंगाल, गोव्यातील धेंपे यासारख्या संघांतून झळकला...
  • 2010 मध्ये सुनील छेत्री परदेशी लीगमध्ये खेळणारा मोहम्मद सलीम व बायचुंग भूतिया यांच्यानंतरचा केवळ तिसरा भारतीय फुटबॉलपटू बनला. त्यावेळी त्याला करारबद्ध केलं ते अमेरिकेच्या ‘मेजर लीग सॉकर’मधील ‘कॅन्सस सिटी विझार्ड्स’नं. मात्र एका हंगामानंतर तो 2011 मध्ये चिराग युनायटेडकडे करारबद्ध होऊन परतला....
  • 2012 मध्ये त्याला परदेशी लीगमध्ये खेळण्याची दुसऱ्यांदा संधी चालून आली ती ‘स्पोर्टिंग क्लुब दि पोर्तुगाल’मुळं. परंतु त्याला पाच वेळा स्थान मिळालं ते फक्त राखीव संघात. तिथून भारतात परतल्यावर तो गोव्यातील ‘चर्चिल ब्रदर्स’ व त्यानंतर ‘आय-लीग’मध्ये खेळणाऱ्या ‘बेंगळूर एफसी’कडे करारबद्ध झाला...
  • सुनीलनं दोन मोसमात ‘बेंगळूर एफसी’तर्फे उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर ‘मुंबई सिटी एफसी’नं त्याला खेचताना 2015 मध्ये नवनिर्मित ‘इंडियन सुपर लीग’मधील सर्वांत महागडा भारतीय खेळाडू बनवलं...‘आयएसएल’मध्ये हॅट्ट्रिक करणारा पहिला भारतीय फुटबॉलपटू म्हणून त्यानं नोंद केली ती याच क्लबमार्फत.
  • पुढं पुन्हा तो ‘बेंगळूर एफसी क्लब’कडे वळला...2018-19 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ‘आयएसएल’ किताब ‘एफसी गोवा’ला हरवून जिंकला तो छेत्रीच्याच अधिपत्याखाली...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :

.