महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सर्वांकडे समदृष्टीने पहावे

06:52 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

जो मनुष्य कर्म करून बाप्पांना अर्पण करेल त्याचं नवीन प्रारब्ध तयार होणार नाही व हळूहळू त्याची चित्तशुद्धी होत जाईल. अशा शांत माणसाच्या मनात परमेश्वराचे प्रतिबिंब उमटते आणि विलक्षण अशा मन्न:शांतीचा अनुभव येतो. कर्मे बाप्पांना अर्पण करायची, फळाची अपेक्षा करायची नाही म्हंटल्यावर माणसाची कर्म करायची इच्छाच संपून जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन बाप्पा पुढं सांगतायत की, पूर्वकर्मानुसार माणसाचे प्रारब्ध तयार होते व त्यानुसार कर्मे करण्यासाठीच त्याचा जन्म होतो. त्याने जर ती करण्याचे टाळले तर जन्म वाया जाऊन पुढल्या जन्माची आपोआपच जुळणी होते. निष्काम कर्माने प्रारब्धाला अनुसरून जे भोग मिळतील त्यात समाधानी राहण्याची वृत्ती वाढीस लागून मनुष्य मन:शांतीचा धनी होतो. एकदा ह्या मन:शांतीची चटक लागली की, माणसाला इतर कोणत्याच गोष्टीची आवश्यकता वाटत नाही. ही अवस्था अखंड टिकू लागली की, वैराग्य प्राप्त होते. म्हणून कर्मच करायचं नाही असं न ठरवता निरपेक्ष कर्म करून कर्मयोग साधावा असं बाप्पा सांगतात. कर्मयोगामुळे चित्तशुद्धी साधलेल्या साधकास ब्रह्म सर्वत्र भरून राहिलेले आहे असा साक्षात्कार होतो.

Advertisement

आत्मोद्धार होण्याच्या दृष्टीने पहिला चांगला योग म्हणजे कर्मयोग असे बाप्पांनी सांगितले. कर्मयोगाबद्दल सांगितल्यावर मागील श्लोकात बाप्पांनी सांगितलेली ब्रह्मऐक्यबुद्धी प्राप्त होणे हा दुसरा योग होय. त्याबद्दल सांगताना बाप्पा म्हणाले,

योगमन्यं प्रवक्ष्यामि शृणु भूप तमुत्तमम् ।

पशौ पुत्रे तथा मित्रे शत्रौ बन्धौ सुहृज्जने ।। 41 ।।

अर्थ- मी आता दुसरा योग सांगतो. हे राजा, तो उत्तम योग ऐक, पशु, पुत्र, तसाच मित्र, शत्रू, बंधु, सुहृज्जन यांचे ठिकाणी असलेले माझे आदिबीज लक्षात घेऊन सर्वांकडे समदृष्टीने पहावे.

विवरण- हे सर्व चराचर विश्व ब्रह्मव्याप्त आहे परंतु माणसाच्या मनात असलेल्या अपपर भावाने त्याला सर्वत्र ब्रह्माची प्रचीती येत नाही. बाप्पा हे ब्रह्माचं सगुण रूप असल्याने सजीव निर्जीव सृष्टी ही बाप्पांचीच निर्मिती आहे. बाप्पा आपल्या सर्वांचे कुटुंबप्रमुख आहेत. आपण सर्व एकाच म्हणजे बाप्पांच्याच कुळातील आहोत पण ही बाब आपण लक्षात घेत नाही. म्हणून बाप्पा म्हणतात, सगळ्यांच्यातलं माझं बीज पहायला शिका म्हणजे तुमच्यातील अपपर भाव आपोआप कमी होईल. शत्रूता संपुष्टात येईल अपपर भाव व शत्रुत्व तुमच्या मनाला अस्वस्थ करतं. साहजिकच ब्रह्मऐक्यभाव विकसित व्हायला अडथळा निर्माण होतो. हे झालं बाह्य सृष्टीबाबत पण आपल्या मनात डोकावून पाहतानाही ह्याचं व्यवधान आपल्याला ठेवावं लागतं. ह्याबाबत आपल्या मनात प्रसंगानुसार उमटणाऱ्या भावनांकडे कसं बघावं ते बाप्पा पुढील श्लोकात सांगतायत.

बहिर्दृष्ट्या च समया हृत्स्थयालोकयेत्पुमान् ।

सुखे दु:खे तथा? मर्षे हर्षे भीतौ समो भवेत् ।। 42 ।।

अर्थ- बाह्य सृष्टीप्रमाणेच मनुष्याने त्याच्या मनातील सुख-दु:ख, क्रोध, हर्ष, भीति या भाव भावनांचे ठिकाणी समान असावे.

विवरण- बाप्पा म्हणतात, आत्मा अमर आहे तर शरीर तात्पुरते असून नाशवंत आहे हे लक्षात घेऊन शरीराला भोगावे लागणारे सुखदु:खाचे प्रसंग हे शरीरापुरते मर्यादित असतात हा मुद्दा समजून घे. आत्मा वेगळा आणि शरीर वेगळे. ज्याप्रमाणे आकाशात उडणाऱ्या पक्षाची सावली जमिनीवरून पुढेपुढे जात असते. तो पक्षी आकाशातून जसजसा उडत जाईल त्याप्रमाणे वाटेत लागणारे खाचखळगे, नद्यानाले, डोंगर पर्वत शेतीवाडी यावरून धडपडत सावलीचा प्रवास सुरु असतो पण हवेत आनंदाने उडणाऱ्या पक्षाला त्याचे काहीच नसते. त्याप्रमाणे आपण आत्मस्वरूपात स्थिर होऊन शरीर भोगत असलेल्या सुखदु:खांकडे अलिप्तपणे पहायला शिकलं पाहिजे.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article