गावातील प्रत्येक जण भविष्यवेत्ता
इंडोनेशियाच्या जावा बेटावर घनदाट जंगल आणि पर्वतांच्या अस्तित्वामुळे एक रहस्यमय जग निर्माण झाले आहे. तेथे बादुई समुदाय वसलेला आहे. हे गाव नकाशात दिसते, परंतु बाहेरील जगाशी त्याचा संपर्क फारच कमी आहे, यामुळे तेथे मोबाइल, रेडिओ किंवा वीज यासारख्या गोष्टी स्वप्नवत आहेत. बादुई लोक पृथ्वीवरील पहिले मानव असल्याचे मानले जाते. हे लोक कठोर नियमांचे पालन करतात. परंतु या समुदायाचे धार्मिक नेते अलौकिक शक्ती बाळगून असतात, मन वाचणे, भविष्यवाणी करणे आणि भाग्याला प्रभावित करत असल्याचे मानले जाते.
बादुई समुदायाचे राहणीमान आणि त्यांच्या कथित शक्तींचा उल्लेख सध्या सोशल मीडियावर होत आहे. आजच्या काळातही अशाप्रकारचा समुदाय अस्तित्वात असल्याचा प्रथमदर्शनी विश्वासच बसणार नाही. बादुई समुदायाला कंजडो बादुई देखील म्हटले जाते. बानटेन प्रांताच्या कंधरासि गावानजीक हा समुदाय राहतो. सुमारे 1200 सदस्यांचा हा समुदाय सुंदा भाषा बोलतो. हे लोक स्वत:ला सृष्टीवरील प्रथम लोक मानतात. याचमुळे निसर्गासोबत सामंजस्य राखणे त्यांचा धर्म आहे. बादुई लोक मातीची धूप रोखण्यासाठी धातूच्या नांगराचा वापर करत नाहीत. येथे शालेय शिक्षण, काच, मद्य, बूट, चार पाय असलेले प्राणी पाळण्यावर बंदी आहे.
हत्या, चोरी, असत्य, व्यभिचार, नशा, रात्री खाणे, वाहन चालविणे, फुल किंवा अंतर लावणे, सोने-चांदी स्वीकारणे, पैशांना स्पर्श करणे आणि केस कापण्यासही मनाई आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांना गावाच्या बाहेरील हिस्स्यात वास्तव्य करावे लागते. या नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांना आउटर झोनमध्ये बेदखल करण्यात येते.
बदल घडतोय
हा समुदाय दोन हिस्स्यांमध्ये विभागलेला आहे, आउटर बादुई (बाहेरील गाव)मध्ये काहीप्रमाणात आधुनिकतेचा शिरकाव झाला आहे. तर इनर बादुई (केवळ 3 गावं) मध्ये शुद्ध परंपरा कायम आहेत. इनर बादुईमध्ये कुणीच बाहेरचा शिरू शकत नाही. धार्मिक नेत्याला ‘पु’उन म्हटले जाते, समुदायाचे केंद्र तेच असतात. हा धार्मिक नेता अलौकिक शक्ती बाळगून असल्याची मान्यता आहे. ते मन वाचू शकतात, भविष्यवाणी करू शकतात आणि भाग्य बदलू शकतात, असे सांगण्यात येते. कुठलाच बाहेरील व्यक्ती त्यांच्या पवित्रस्थळी होणारे विधी पाहू शकत नाही.हे विधी निसर्गाची पूजा आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ होतात. बादुईचा विश्वास सांगा सरी (सुंदा हिंदू) परंपरेतून येतो, जेथे निसर्ग देवता आहे, ते पांढरे कपडे परिधान करतात. केस लांब ठेवतात आणि कृषी लाकडी अवजारांनी करतात. भात आणि मक्याचे पिक ते घेतात. परंतु जंगलातून फळे-भाज्या जमा करणे मुख्य उपजीविका आहे.