दरवर्षी 2 लाख भारतीय सोडतात देश
परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांची लोकसभेत माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रत्येक वर्षी साधारणत: दोन लाख भारतीय भारत देश सोडून अन्य देशांमध्ये स्थिरावत आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये 9 लाख भारतीयांनी भारत सोडून विदेशात वास्तव्य केले आहे. 2021 नंतर भारतीय नागरीकत्व सोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देतान दिली. विदेशांमध्ये चांगली नोकरी मिळवून दिली जाईल, असे अमिष दाखवून युवकांना बेकायदेशीररित्या अन्य देशांमध्ये जाण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या काही अॅप्सवरही कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारे 678 युवकांना फसवणूक होण्यापासून वाचविण्यात आले आहे, अशी आकडेवारीही सिंग यांनी दिली.
2022 मध्ये 2 लाखांहून अधिक लोकांनी भारत सोडला आहे. तर 1 लाख 63 हजार 370 लोकांनी 2021 मध्ये भारताचा त्याग केला. 2023 मध्ये ही संख्या 2 लाख 16 हजार 223 तर 2024 मध्ये ती 2 लाख 6 हजार 378 लोकांनी विदेशात स्थायिकत्व स्वीकारले आहे. 2011 ते 2019 या आठ वर्षांच्या कालावधीत 11 लाख 89 हजार 194 भारतीय नागरीकांनी विदेशी नागरीकत्व मिळविले आहे. विदेशात कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त, तसेच पर्यटनानिमित्त गेलेले भारतीय नागरीक संकटात असतील तर त्यांना सल्ला देण्यासाठी व साहाय्य करण्यासाठी केंद्राने ‘मदद’ नामक मोबाईल अॅप लाँच केलेले आहे.
परतले 6 हजार भारतीय
गेल्या पाच वर्षांमध्ये मध्यपूर्वेच्या देशांमधून 5 हजार 945 भारतीय देशात परतले आहेत. त्यांना भारताने धोकग्रस्त देशांमधून सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले आहे. इस्रायलमधून ‘अजय अभियाना’च्या अंतर्गत तर इराणमधून ‘सिंधू अभियाना’च्या अंतर्गत भारतात आणण्यात आले आहे. कुवेतच्या अग्निकांडात ठार झालेल्या 45 भारतीयांचे मृतदेहही भारतात आणण्यात आले आहेत, अशी माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत शुक्रवारी दिली आहे.