गावातील प्रत्येक पुरुष आचारी
बालपणापासूनच शिकतात स्वयंपाकाची कला
स्वयंपाक करणे एक कला असून ती प्रत्येकालाच जमते असे नाही. याचमुळे कुणाच्या हाताला उत्तम चव असते, तर काही जणांकडून बेताचाच स्वयंपाक होत असतो. भारतात एक असे गाव आहे, जेथे स्वयंपाकाची कला शिकणारे शेकडो लोक आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या गावात राहणारा प्रत्येक पुरुष उत्तम स्वयंपाक करू शकतो. याचमुळे याला आचाऱ्यांचे (शेफ) गाव म्हटले जाते. तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यात कलायूर नावाचे गाव आहे. या गावात तुम्ही प्रवेश करताच तुम्हाला खाद्यपदार्थांचा आणि मसाल्यांचा सुगंध दूरवरून येऊ लागतो. दक्षिण भारतातील कलायूर गाव उत्तम जेवणासाठी ओळखले जाते. येथील भोजनाचा स्वाद लोकांना अत्यंत पसंत आहे.
प्रत्येक घरात एक आचारी
कलायूर गावातील प्रत्येक घरात एक आचारी असतो. सुमारे 500 वर्षांपूर्वी या गावात रे•ियार नावाचा समुदाय राहत होता, हा समुदाय सवर्ण मानला जायचा, एकप्रकारे हे व्यापारी असायचे. त्यांनी स्वयंपाकाची जबाबदारी वनियार लोकांना दिली. हे रे•ियार यांच्या तुलनेत कनिष्ठ मानले जायचे. परंतु या लोकांना उत्तम स्वयंपाक करता यायचा, यांना अनेक गुप्त पाककृतींची माहिती होती. यामुळे ते इतर समुदायांपेक्षा उत्तम स्वयंपाक करू शकत होते. त्या काळात शेती हा लाभदायक व्यवसाय नव्हता, यामुळे लोक स्वयंपाक करण्याचाच छंद बाळगू लागले. येथूनच या गावात आचाऱ्यांची प्रथा सुरू झाली. सद्यकाळात कलायूरचे आचारी सुमारे 6 महिने दक्षिण भारताची यात्रा करतात आणि विविध उत्सव किंवा समारंभांमध्ये स्वयंपाक करून लोकांची मने जिंकतात. विवाहसोहळा आणि जन्मोत्सवात स्वयंपाक करण्याची जबाबदारी त्यांनाच दिली जाते. या लोकांना सर्वप्रकारची सामग्री उपलब्ध करून दिल्यास ते केवळ 3 तासांत हजारो लोकांना पुरेल इतका स्वयंपाक करू शकतात.
कसे दिले जाते प्रशिक्षण?
कलायूरमध्ये आचारी होण्याचे प्रशिक्षण बालपणापासूनच सुरू केले जाते. सर्वप्रथम भाजी कापणे शिकविण्यात येते, यानंतर शेतांमधून सर्वात ताज्या भाज्या कशाप्रकारे तोडाव्यात हे शिकविले जाते. या कलेत ते पारंगत झाल्यावर त्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ कसे तयार केले जावेत याचे धडे दिले जातात. 10 वर्षांपर्यंत प्रशिक्षण दिले जाते, मग संबंधित इसम मदतनीसांची निवड करून टीम तयार करतो.