दर 6 महिन्यांनी बेटावर दुसऱया देशाचा कब्जा
350 वर्षांपासून सुरू आहे हे सत्र
जग एकाहून एक अशा अजब गोष्टींनी भरलेले आहे. कित्येकदा निसर्गच अनोख्या गोष्टी निर्माण करतो तर काहीवेळा माणूसच अजब अन् विचित्र प्रकार घडवत असतो. अशाच एका वेगळया प्रकारच्या करारामुळे एक बेट चर्चेत आले आहे.
जगात एक-एक इंच भूमीसाठी युद्ध होत असताना एक बेट दर 6 महिन्यांनी अन्य देशाच्या नकाशात सामील होते. हा प्रकार कुठलेही भांडण किंवा युद्धाशिवाय होत असतो. निम्म्या वर्षानंतर हे बेट पुढील देशाच्या ताब्यात जाते आणि हे सत्र शतकांपासून चालत आले आहे.
पृथ्वीवर अनेक छोटी-मोठी बेटे आहेत. यातील अनेक बेटे ही सुंदर परंतु काही विशेष नियमांनी प्रसिद्ध आहेत. परंतु काही बेट निर्जन असून तेथे कुणीच राहत नाही. एक बेट मात्र राजनयिक अन् भौगोलिकदृष्टय़ा अनोखे आहे. या बेटाचे नाव फीजैंट असून त्याला फॅसेंस आयलँड या नावाने देखील ओळखले जाते.
हे जगातील एकमेव असे बेट आहे जे एकाचवेळी दोन देशांच्या कब्जात आहे आणि दोन्ही देश प्रत्येकी 6 महिने यावर राज्य करतात.
फ्रान्स अन् स्पेन या दोन देशांदरम्यान हे बेट आहे. दोन्ही देश या बेटावरून 350 वर्षांपूर्वी सहमत झाले आहेत. 1659 मध्ये फ्रान्स आणि स्पेन या दोन्ही देशांदरम्यान या बेटाच्या अदलाबदलीवरून एक शांतता करार झाला आहे. या कराराला पायनीसचा करार म्हणून ओळखले जाते. करारानंतर 200 मीटर लांब अन् 40 मीटर रुंद या बेटावर 1 ऑगस्टपासून 31 जानेवारीपर्यंत फ्रान्सचा कब्जा राहतो. तर एक फेब्रुवारीपासून 31 जुलैपर्यंत या बेटावर स्पेनचे नियंत्रण असते.