प्राप्तीकर भरण्यात महिलाही नाहीत मागे...
21 व्या शतकात आता सर्वच क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढताना दिसतो आहे. उद्योग क्षेत्रातही महिलांचे योगदान गेल्या काही वर्षात वाढलेले दिसले आहे. यासोबतच नव्याने मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तीकर परतावा भरणाऱ्या महिलांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या 4 वर्षात महिला प्राप्ती कर परतावा भरणाऱ्या महिलांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली आहे.
प्राप्तीकर विभागाने अलीकडेच याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2023-24 वर्षात प्राप्ती कर परतावा भरणाऱ्यांची संख्या 2.29 कोटींवर पोहचली आहे. जी 2019-20 च्या वर्षात पाहता 1.83 कोटी इतकी होती. याचाच अर्थ गेल्या काही वर्षात कमावत्या महिलांच्या संख्येत चांगली वाढ झाली आहे असा घेता येईल. चांगल्या वेतनाच्या नोकरीच्या संधी तसेच स्वतंत्र व्यवसाय या गोष्टी महिलांना प्राप्ती कर परतावा भरण्यासाठी प्रेरीत करणाऱ्या ठरल्या आहेत. 2023-24 या वर्षात एकंदर पाहता 7.97 कोटी जणांनी प्राप्ती कर परतावा भरला आहे. ज्यात वैयक्तिक व कॉर्पोरेट यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नाव प्रामुख्याने पुढे आले आहे. महिला प्राप्ती कर परतावा भरण्यात महाराष्ट्र राज्याने आघाडी घेतल्याचे पहायला मिळाले आहे. 2023 च्या तुलनेत 23 टक्के वाढीसह महाराष्ट्रातील 36,83,457 महिलांनी आयटीआर भरल्याची माहिती आहे. इतर राज्यातील महिलांचा विचार करता दुसऱ्या नंबरवर गुजरात हे राज्य राहिले आहे. 24 टक्के वाढीसह गुजरातमध्ये 22,50,098 महिलांनी प्राप्तीकर परतावा भरला आहे. तिसऱ्या नंबरवर उत्तर प्रदेश असून तेथील 20,43,794 महिलांनी प्राप्ती कर परतावा भरला आहे. मागच्या वर्षाशी जर का तुलना केली तर उत्तर प्रदेशात प्राप्ती कर परतावा भरणाऱ्या महिलांची संख्या 29 टक्के इतकी वाढली आहे.
अशाच प्रकारची उत्साहवर्धक वाढ इतर राज्यांच्याबाबतीतही पहायला मिळाली आहे. दक्षिणेतील राज्य तामिळनाडूत प्राप्ती कर भरणाऱ्या महिलांची संख्या 20 टक्के वाढीसोबत 15,51,769 वर पोहचली आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये राज्यात प्राप्ती कर परतावा भरणाऱ्या महिलांची संख्या 12,92,028 इतकी होती. यासोबत कर्नाटकातही 20 टक्केच संख्या वाढली असून 14,30,345 महिलांनी आयटीआर दाखल केले आहे. 2020 ला ही संख्या येथील 11,34,903 इतकी होती. पंजाबमध्ये 36 टक्के आयटीआर भरणाऱ्या महिलांची संख्या वाढली असून ती 9,70,801 वर पोहचली असून राजस्थानमध्ये 25 टक्के वाढ झाली असून संख्dया 13,52,202 वर पोहचली आहे. छोटी राज्ये केंद्रशासित प्रदेशांनी सुद्धा यामध्ये चांगला वाटा उचललल्याचे दिसले आहे. मिझोरममध्ये आयटीआर भरणाऱ्या महिलांचे प्रमाण 96 टक्के वाढले आहे तर जम्मू आणि काश्मीरमध्ये हे प्रमाण 49 टक्के इतके वाढले आहे.
भारतात कोट्याधीश असणाऱ्या कर भरणाऱ्यांची संख्या 2,20,000 पेक्षा अधिक झाली आहे. गेल्या एक दशकाचा कालावधी पाहिल्यास कर भरणाऱ्यांची कोट्याधीशांची संख्या पाचपट वाढली आहे. एवढंच नाही तर कोरोनाची सुरुवात झाल्यानंतरच्या तीन वर्षातच कोट्याधीश करदात्यांची संख्या 1 लाखांनी वाढली आहे. टक्केवारीत पाहता महाराष्ट्रात महिलांचे प्रमाण 16 टक्के असून पहिल्या स्थानावर हे राज्य आहे. यापाठोपाठ गुजरात 9.8 टक्के, उत्तर प्रदेश 8.9 टक्के, तामिळनाडू 6.8 टक्के, कर्नाटक 6.2 टक्के, राजस्थान 5.9 टक्के, पंजाब 5.8 टक्के, पश्चिम बंगाल 5.6 टक्के आणि दिल्लीचे प्रमाण 5.3 टक्के इतके दिसून आले आहे. 28 राज्यांपैकी 16 राज्यांतील महिलांनी विक्रमी स्तरावर आयटीआर दाखल करण्याचे कार्य केले आहे.