पोलिसांनाही वाटतेय आता कुत्र्यांची भीती
बुधवारी कॅम्प परिसरातील 35 कुत्र्यांचे लसीकरण
बेळगाव : भटक्या कुत्र्यांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता पोलिसांनाही सहन करावा लागत आहे. राज्य पोलीस महासंचालकांनी घरोघरी पोलीस ही संकल्पना राबविण्याची सूचना केली आहे. मात्र गल्लीबोळात फिरताना कुत्र्यांच्या दहशतीचा सामना करावा लागत असल्याने भटकी कुत्री पकडून नेण्यात यावीत, असे पत्र कॅम्प पोलिसांकडून मनपा आयुक्तांना पाठविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी कॅम्प परिसरातील 35 कुत्र्यांना अँटीरेबीज लस टोचण्यात आली. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने कुत्र्यांच्या कळपाकडून नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. कुत्र्यांचे निर्बीर्जीकरण करण्याची मोहीम थंडावली असून, सध्या केवळ लसीकरणावर भर देण्यात आला आहे. अलिकडेच सांबरा रोडवरील मारुतीनगर येथे एका बालिकेवर कुत्र्याने हल्ला करून चेहऱ्याचे लचके तोडले आहेत. त्यामुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुत्री पकडून नेण्याचे मनपा आयुक्तांना पत्र
राज्य पोलीस खात्याकडून सर्व जिल्ह्यांमध्ये घरोघरी पोलीस ही संकल्पना राबविली जात आहे. मात्र पोलिसांनादेखील आता कुत्र्यांची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे कॅम्प परिसरातील कुत्री पकडून नेण्यात यावीत, असे पत्र कॅम्पच्या पोलीस निरीक्षकांनी मनपा आयुक्त शुभा बी यांना पाठविले आहे. त्यानुसार बुधवारी विनायकनगर, विजयनगर, पाईपलाईनरोड परिसरातील 35 कुत्री पकडून त्यांना अँटीरेबीज लस टोचण्यात आली.