महादेवांनाही गीतेचा अंत लागत नाही
महाभारतातील भीष्मपर्वात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या गीतेचा उल्लेख आहे. माउली श्रोत्यांची विनवणी करताना म्हणतात, श्रोतेहो, तुम्ही मायबाप होऊन माझा स्वीकार करा आणि माझे जे काय उणे असेल ते सहन करून घ्या. हे गीतार्थाचे मला न झेपणारे काम सद्गुरूंच्या आज्ञेने मी करत आहे. या गीतार्थाची महती अशी की, स्वत: महादेवांनाही गीतेचा अंत लागत नाही. त्यांना ती प्रत्येकवेळी नित्यनूतन भासते. वेद आणि गीतेतील फरक सांगायचा झाला तर वेद हा परमेश्वराचे घोरणे आहे कारण तो त्यांनी निद्रावस्थेत सांगितला आहे तर गीता जागेपणी सांगितली आहे. माउलींनी इथपर्यंत सांगितल्यावर सद्गुरू निवृतीनाथ त्यांना म्हणाले, आता तू लवकरच गीतेवर मराठीमध्ये भाष्य करायला सुरवात कर. श्रीगुरूंच्या सांगण्यावर अतिशय आनंदित होऊन माउलीनी कौरव पांडवांच्या युध्दाचा प्रसंग सांगायला सुरवात केली. गीतेच्या पहिल्या अध्यायाचे नाव अर्जुनविषादयोग असे आहे. नातेवाईकांशी युद्ध करायचे ह्या कल्पनेने अर्जुनाला अतिशय वाईट वाटू लागले म्हणून ह्या अध्यायाला हे नाव दिले आहे. विषाद म्हणजे दु:खाचा कडेलोट होणे. माउली महाभारतीय युद्धाचे चित्र आपल्यापुढे इतके हुबेहूब उभे करतात की, जणूकाही ते आत्ताच आपल्यापुढे घडत आहे. ते म्हणतात, मुलांच्या ममतेने धृतराष्ट्र वेडा झालेला होता. धृतराष्ट्र अंध असल्याने त्याला युद्धाची सर्व हकीकत कळावी म्हणून भगवान व्यासांनी संजयला दिव्य दृष्टी दिली. तिचा उपयोग करून संजय युद्धभूमीवर काय चाललेले आहे त्याचे प्रत्यक्ष वर्णन धृतराष्टाला सांगत होता. मुलांच्या ममतेने वेडा झालेल्या धृतराष्ट्राने संजयाला विचारले, संजया, कुरुक्षेत्रीची हकिकत काय आहे ती मला सांग. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने जमलेले आहेत. तरी तेथे ते एवढा वेळ काय करीत आहेत ते मला लौकर सांग.
त्या पवित्र कुरू-क्षेत्री पांडूचे आणि आमुचे । युध्दार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजया ।। 1 ।।
धृतराष्ट्राच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय म्हणाला,
पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधने तिथे । मग गेला गुरूपाशी त्यास हे वाक्य बोलीला ।।2।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, संजय धृतराष्ट्राला युद्धभूमीवरची माहिती देऊ लागला. तो म्हणाला, पांडवसैन्याने उठाव केला तेव्हा त्या सैन्याचे अक्राळविक्राळ स्वरूप ज्यांनी बघितले. त्यांना असे वाटले की, आता महाप्रलय होणार असून काळ त्यासाठी तोंड उघडून बसला आहे. काळकूट हे अतिविष एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोण समर्थ असतो? अथवा वडवानल म्हणजे समुद्राच्या पोटातील अग्नी पेटून वाऱ्याने भडकला की, अक्राळविक्राळ स्वरूप धारण करून तो सागराचे शोषण करतो. त्यावेळी त्याच्या ज्वाला आकाशाला भिडल्यावर त्यांची जी भयानकता जाणवते त्याप्रमाणे अनेक व्यूह रचून सज्ज झालेले पांडवांचे सैन्य फारच भयंकर दिसत आहे. परंतु ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच किंमत देत नाही. त्याप्रमाणे दुर्योधनाने त्या सैन्याच्या महाभयंकरतेची बिलकुल पर्वा केली नाही. तो द्रोणांजवळ येऊन त्यांना म्हणाला,
गुरूजी तुमचा शिष्य शाहणा द्रुपदात्मज । विशाळ रचिले त्याने पहा पांडव सैन्य हे ।।3 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, राजाला माहिती देताना संजय म्हणाला, दुर्योधन द्रोणांना म्हणतोय की, हे पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पहा. हुशार अशा द्रुपदपुत्र धृष्ट्याद्युम्नाने सैन्याचे हे नानाप्रकारचे व्यूह डोंगरी किल्ल्याप्रमाणे सभोवार रचलेले आहेत.
क्रमश: