कॉलेजमध्येही आता ‘युनिफॉर्म’
उच्च शिक्षण संचालनालयाकडून परिपत्रक जारी: सर्व विद्यार्थ्यांमध्ये समानता, शिस्त येण्याची अपेक्षा
पणजी : उच्च शिक्षण संचालनालयाने 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी नुकतेच संचालनालयाने परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने सरकारने उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यक्रमांतर्गत नोंदणी केलेल्या सर्व सरकारी व अनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या सत्रापासून त्यांच्या संबंधित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
गणवेशामुळे येते समानता
महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश लागू केल्यामुळे शैक्षणिक वातावरणात सकारात्मक परिणाम दिसून येतो. तसेच त्यातून विद्यार्थ्यांमध्ये कपड्यांच्या निवडीशी संबंधित विचलता कमी होते व आपसात आपुलकीची भावना निर्माण होते. त्यामुळे सामाजिक-आर्थिक विषमतेतील अंतर भरून निघते.
स्वयंशिस्त, जबाबदारीची भावना
अशाप्रकारे पोशाखाचे प्रमाणीकरण झाल्यामुळे विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी काहीही असली तरी त्यांच्यात एक सर्वसमावेशक वातावरण तयार होते व विद्यार्थ्यांना त्यांच्यात समानता वाटते. त्याबरोबर व्यावसायिक वातावरणासाठी ते तयार होतात व त्यांच्यात स्वयं-शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण होते, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान,गणवेशा संदर्भातील तपशील संबंधित महाविद्यालयांद्वारे निश्चित करण्यात येणार आहेत. मात्र या गणवेशासाठी होणारा खर्च साहाय्य योजनेत समाविष्ट नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
संचालनालयाचा चांगला निर्णय
कॉलेज विद्यार्थ्यांना गणवेश लागू करणे हा उच्च शिक्षण संचालनालयाचा चांगला निर्णय आहे.आमच्या कॉलेजमध्ये गणवेश सुरुवातीपासून आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. मुलांमध्ये समानता येते. गरीबांना वेगवेगळे कपडे खरेदी करणे शक्य नसते, त्यामुळे त्या मुलांमध्ये वेगळी भावना निर्माण होते, पण ती भावना आमच्या कॉलेजमध्ये दिसत नाही. विचित्र फॅशनेबल कपडे घालून विद्यार्थी येत नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना सध्या युनिफॉर्मची सवय नाही, त्यांना आता ही युनिफॉर्म सक्ती नकोशी वाटणार, पण एकूण शिक्षणक्षेत्र व समाजाचा विचार करता युनिफॉर्म सक्ती ही सर्वांच्याच हिताची आहे, अशी प्रतिक्रिया हरमल येथील गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशनचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. कुंज प्रियोळकर यांनी दिली.
-डॉ. कुंज प्रियोळकर