बेळगावातही नीट परीक्षार्थींना कोट्यवधींना ठकवले
एमबीबीएसला प्रवेश देण्याचे सांगून फसवणूक : तेलंगणामधील एका ठकसेनाला अटक
प्रतिनिधी / बेळगाव
वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामुळे देशभरातील विद्यार्थी चिंतेत असतानाच बेळगावातही नीटचा एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. नीट परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना गाठून चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे सांगून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांना कोट्यावधी रुपयांना ठकवल्याच्या आरोपावरून तेलंगणामधील एका ठकसेनाला अटक करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी सोमवारी ही माहिती दिली आहे. मार्केट पोलिसांनी मुंबई येथील साकीनाका परिसरात अरगोंड अरविंद ऊर्फ अरुणकुमार (वय 47) रा. इंदिरानगर, गच्ची बौळी, जि. रंगारेड्डी, तेलंगणा, सध्या रा. कोंडकल्ल-शंकरपल्ली, जि. संगारेड्डी याला अटक केली आहे. 28 जून रोजी अरगोंड अरविंदला अटक करून त्याची कसून चौकशी करण्यात आली असून हैदराबादसह तेलंगणा व आंध्रप्रदेशमधील विविध ठिकाणी तपास करण्यात आला आहे.
मार्केटचे एसीपी सोमेगौडा जी. यु. यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश द्यामण्णावर, पोलीस उपनिरीक्षक एच. एल. केरुर, हवालदार शिवप्पा तेली, व्ही. बी. माळगी, के. एम. कन्नमन्नवर, सचिन गोकावी आदींनी ही कारवाई केली आहे. बेळगाव येथील कोल्हापूर सर्कल परिसरात कार्यालय थाटून नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे कौन्सिलिंग करण्याच्या निमित्ताने त्यांना ठकविण्यात येत होते.
28 नोव्हेंबर 2023 रोजी अस्पिया बेगम, मोहम्मद तजमूल अहमद रा. मिर्झापूर ताज, जि. बिदर यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. अरगोंड अरविंद ऊर्फ अरुणकुमारने बेळगाव येथील सिटी प्लाझामध्ये नीट गाईडन्स नामक कार्यालय थाटून आपल्यासह दहाहून अधिक जणांना एमबीबीएससाठी सरकारी कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे सांगून त्याने 1 कोटी 30 लाख 41 हजार 884 रुपयांना ठकविल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले होते.
तेव्हापासूनच मार्केट पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. मात्र, बेळगाव येथील आपले बस्तान त्याने मुंबई येथील साकीनाका परिसरात हलवल्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य झाले नाही. तरीही पोलिसांनी त्याचा पाठपुरावा सुरूच ठेवला होता. मुंबइ= त्याला अटक करून बेळगावला आणण्यात आले असून सध्या त्याला हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे.
नीट गाईडन्सच्या कार्यालयात त्याने दहा ते बारा तरुणांचीही भरती केली होती. ऑनलाईनच्या माध्यमातून नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळाल्यानंतर संबंधित विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संपर्क साधण्यात येत होता. नीट परीक्षेत कमी गुण मिळाले तर काय झाले? पैसे दिलात तर सरकारी कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश मिळवून देऊ, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला जात होता. त्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळण्यात येत होती.
12 लाख रोख रक्कमसह मुद्देमाल जप्त पोलिसांनी अरगोंड अरविंदच्या बेळगाव कार्यालयातून पंधरा मॉनिटर, बारा की-बोर्ड, माऊस, बारा अॅडॅप्टर, बायोमेट्रिक मशीन, एक डीव्हीआर, एक लॅपटॉप जप्त केले असून त्याला अटक केल्यानंतर 12 लाख रुपये रोख रक्कम, 5 मोबाईल संच, 3 क्रेडिट व डेबिट कार्ड जप्त केले आहेत. |
अरगोंड अरविंदचे कारनामे पोलिसांनी अटक केलेल्या अरगोंड अरविंदवर केवळ कर्नाटकातच नव्हे तर तेलंगणा, मध्यप्रदेशमध्येही गुन्हे दाखल झाले आहेत. हैदराबादमधील एका पंजीगुट्टा पोलीस स्थानकात पाच गुन्हे दाखल झाले आहेत. बेंगळूर येथील आर. टी. नगर पोलीस स्थानकातही त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्येही अरगोंड अरविंदवर एफआयआर दाखल झाला आहे. नीट परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना गाठून त्यांना डॉक्टर बनविण्याचे स्वप्न दाखवून त्यांची लूट करण्यात त्याचा हातखंडा आहे. त्याचे साथीदार अद्याप फरारी असून पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. |