सरकार कोसळले तरी चालेल, ‘जात जनगणना’ची अंमलबजावणी करा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी/ बेंगळूर
जात जनगणना अहवालाच्या अंमलबजावणीमुळे सरकार कोसळले तरी चालेल. पण, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी जात जनगणना अहवाल जारी करावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांनी केली आहे. बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शोषित समाजामुळेच काँग्रेस सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा जात जनगणना अहवालाची अंमलबजावणी करावी. सरकार कोसळले तरी चालेल. जात जनगणना अहवाल जारी करण्यासाठी घाबरण्याची गरज नाही. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात जात जनगणना आहे. पण सरकार विचार का करत आहे? आधी जात जनगणना लागू होऊ द्या. सर्व समाजाला लाभ होईल. जनगणनेच्या अंमलबजावणीमुळे सरकार गेले तरी चालेल, असे त्यांनी सांगितले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जाहीरनाम्याबद्दल ज्यांना आदर आहे त्यांनी पाठिंबा द्यावा. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातच त्यांनी जात जनगणना लागू करण्याबाबत म्हटले आहे. एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांनीही अहवाल जारी करणार असल्याचे सांगितले आहेत. जग उलथापालथ झाले तरी जात जनगणना लागू झाली पाहिजे, असे राहुल गांधी म्हटले आहेत. सरकार पडलं तर घाबरायचं कशाला. सरकारची कोंडी झाली तरी जात जनगणना अहवालाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही बी. के. हरिप्रसाद यांनी केली.