प्रज्ज्वल विजयी झाले तरी त्यांचे निलंबन मागे घेऊ नये : विरोधी पक्षनेते आर. अशोक
बेंगळूर : प्रज्ज्वल रेवण्णा यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला तरी त्यांना निजदमधून काही काळासाठी निलंबित करण्याचा निर्णय मागे घेऊ नये, अशी विनंती आम्ही पक्षश्रेष्ठींकडे करू, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सांगितले. बेंगळुरात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, निजदनेही प्रज्ज्वल रेवण्णाचे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. त्यांना यापूर्वीच पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. हासनमध्ये प्रज्ज्वल रेवण्णा विजयी झाले तरी निलंबनाचा आदेश मागे घेऊ नये, अशी आमची विनंती आहे. तपास पूर्ण होईपर्यंत आणि न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत निलंबनाचा निर्णय मागे घेऊ नये. या भूमिकेतून कुमारस्वामी मागे हटू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांच्या अटकेची प्रक्रिया कायद्यानुसार झाली आहे. एसआयटीने त्यांना सुनावणीला उपस्थित राहण्याची नोटीस बजावली होती. न्यायालयाने त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर न केल्याने अखेर ते एसआयटीला शरण आले आहेत. सर्व काही कायद्यानुसार झाले. पोलिसांच्या कारवाईचे मी स्वागत करतो, असे आर. अशोक यांनी सांगितले.