प्राण गेला तरी नाही परतणार : यादव
वृत्तसंस्था / पाटणा
माझा विनाकारण अपमान जिथे झाला आहे, त्या राष्ट्रीय जनता दल या पक्षात मी माझा प्राण गेला तरी परतणार नाही, अशी स्पष्टोक्ती बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी केली आहे. लालू प्रसात यादव यांच्या कुटुंबातील कलहामुळे तेजप्रताप यादव घरातून बाहेर पडले आहेत.
तेजप्रताप यादव हे तेजस्वी यादव यांचे बंधू आहेत. त्यांनी कुटुंबाशी आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षाशी नाते तोडले आहे. त्यांनी ‘जनशक्ती जनता दल’ या राजकीय पक्षाची स्थापना केली असून बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारही उतरविले आहेत. स्वत: तेजप्रताप यादव निवडणूक संघर्षात उमेदवार या नात्याने महुआ मतदारसंघातून उतरले आहेत. त्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न यादव कुटुंबाकडून केले जात आहेत. तथापि, त्यांनी कुटुंबात परतण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. मी माझी वाट पूर्ण विचाराअंती वेगळी केली असल्याने पक्षात पुन्हा परतण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी यापुढे माझ्या नव्या पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. या निवडणुकीतही माझा पक्ष लक्षणीय कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महागठबंधनमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.