गाईंचा वात, ढेकरांवरही कर...
दूधदुभत्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या डेन्मार्क या देशाने एका नव्या आणि विस्मयकारक कराची घोषणा केली आहे. हा कर 2030 पासून तेथील पशुपालकांना भरावा लागणार आहे. तो कशावर आहे, हे समजले तर कोणालाही आश्चर्याचा धक्काच बसेल. हा कर पाळीव गाईंच्या वातावर म्हणजेच त्यांच्या पोटातील वायूवर तसेच त्यांच्या ढेकरांवरही लावला जाणार आहे. यामुळे डेन्मार्कमधील लोकच नव्हे, तर जगभरातील लोक आचंबित झाले आहेत. डेन्मार्कच्या सरकारने या करासंबंधीची माहिती दिली असून, या कराचे कारणही तितकेच विचित्र आहे. पाळीव जनावरांच्या पोटात मिथेन हा वायू निर्माण होतो. हा वायू ‘ग्रीनहाऊस गॅस’ म्हणून ओळखला जातो. या वायूमुळे पर्यावरणाची हानी होते, असे मानले जाते. गाईंच्या पोटातील वायू, त्यांच्या ढेकरा आणि अन्य मार्गाने जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा त्यामुळे पर्यावरवर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी हा कर लावण्यात येणार आहे. मात्र, कर लावून वायू कसा कमी करणार, हा प्रश्न आहे.
2030 या वर्षी डेन्मार्कमधील शेतकऱ्यांना त्यांच्या पाळीव गाई आणि अन्य प्राण्यांवर 450 डॅनिश क्रोनर किंवा 7 हजार 500 रुपये प्रतिटन मिथेन असा कर द्यावा लागणार आहे. तो पुढच्या पाच वर्षांसाठी द्यावा लागणार असून प्रत्येक वर्षी या करात वाढ होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांवरचा कराचा भार हलका करण्यासाठी या करात 60 टक्के सूटही दिली जाऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गाईंप्रमाणे हा कर पाळीव डुकरांवरही लागू होणार आहे. प्रत्येक पाळीव गाय प्रतिदिन 500 लीटर पर्यंत मिथेन वायू वातावरणात सोडत असते. संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या महितीनुसार जनावरांचा वायू जागतिक तापमानवाढीला कारणीभूत आहे. जागतिक तापमान वाढीसाठी जे वायू कारणीभूत ठरतात, त्यांच्यापैकी 12 टक्के वायू जगभरातील पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून सोडला जात आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या तज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी न्यूझीलंडमध्येही अशाच प्रकारचा कर लागू करण्यात आला होता. तथापि, तेथील शेतकऱ्यांनी त्याला जोरदार विरोध केल्याने 2024 पासून हा कर संकलित करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे.