For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महापुरातही भिलवडीने जपली राष्ट्रगीताची परंपरा!

03:55 PM Aug 21, 2025 IST | Radhika Patil
महापुरातही भिलवडीने जपली राष्ट्रगीताची परंपरा
Advertisement

 भिलवडी / घनश्याम मोरे :

Advertisement

कृष्णा नदीच्या तीरावरचं भिलवडी गाव. चारही बाजूंनी पाणी, बंद दुकाने, ओसाड बाजारपेठ आणि सडकेवरून वाहणारा पूर. अशा कठीण प्रसंगातही गुरुवारी सकाळी गावकऱ्यांनी एक अद्वितीय दृश्य अनुभवले.

सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी अचानक सायरन वाजला. संपूर्ण गाव क्षणभर स्तब्ध झालं. त्याचवेळी स्पीकरमधून राष्ट्रगीताचे स्वर घुमले… आणि कमरेपर्यंत पाण्यात बुडालेलं भिलवडी गाव एकाच तालावर उभं राहिलं!

Advertisement

  • पाण्यात उभं राहून देशभक्तीचा जागर

"पाणी घरात आलं, संसार विस्कटला... पण राष्ट्रगीताशिवाय दिवसाची सुरुवात होऊ शकत नाही," असं म्हणणारे गावातील युवक दीपक पाटील आणि अमोल वंडे यांनी कमरेपर्यंत पाण्यात जाऊन एक दुकान उघडलं, स्पीकर सुरू केला आणि परंपरेचा ध्वनी पाण्यालाही चिरून गेला. "राष्ट्रगीत वाजलं की पाण्याची भीती वाटत नाही," असं अमोल हसत सांगतात.

  • परंपरेचा उगम आणि स्वीकार

ही परंपरा १५ ऑगस्ट २०२०, कोरोना काळात व्यापारी संघटनेने सुरू केली. बाजारपेठेत पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम बसवली गेली. त्याद्वारे रोज सकाळी राष्ट्रगीत, गावातील सूचना, हरवलेली वस्तू, शासकीय योजना यांची माहिती दिली जाऊ लागली.
हळूहळू संपूर्ण गावाने हे आपलंसं केलं.

आज गावात एक नियम कटाक्षाने पाळला जातो  "राष्ट्रगीत वाजल्याशिवाय एकही दुकान उघडायचं नाही!" गेल्या पाच वर्षांत हा नियम कधीही मोडलेला नाही. उलट, या परंपरेमुळे भिलवडीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

  • गावकऱ्यांचा अभिमानाचा क्षण

बाजारातील व्यापारी सांगतात, "सकाळी राष्ट्रगीताचे सूर ऐकले की दिवस नव्या उमेदीने सुरू होतो. ही परंपरा आम्हाला शिस्त, ऐक्य आणि आत्मविश्वास देते." शाळकरी मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच या क्षणाला देशभक्तीचा अनुभव घेतात. पालक सांगतात, “ही संस्कारांची बीजे पुढच्या पिढीत उमलतील.”

  • महापुरातील अविस्मरणीय दृश्य

यंदा १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रगीत परंपरेला पाच वर्षे पूर्ण झाली. तेव्हा गाव ५ फूट पाण्याखाली होते. तरीही सकाळी महावितरणकडून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. ओलसर कपडे, भीतीचे वातावरण आणि तरीही स्तब्ध उभे असलेले गावकरी – हा क्षण प्रेरणादायी ठरला.

  • राष्ट्रगीत – संकटावर मात करणारी प्रेरणा

पूर असो, कोरोना असो किंवा कोणतेही संकट… भिलवडीसाठी राष्ट्रगीत ही केवळ परंपरा नाही, ती संघटनशक्ती, आत्मविश्वास आणि देशप्रेमाचा आधार आहे. जर एक गाव दररोज एकसंधपणे राष्ट्रगीतासाठी उभं राहू शकतं, तर हे चित्र इतर गावांनाही प्रेरणा देणारे आहे.

भिलवडीची ही कथा आपल्याला शिकवते की “देशभक्तीचा स्वर कोणत्याही संकटांपेक्षा मोठा असतो!”

Advertisement
Tags :

.