शिष्टाचार समितीचा माईत्रांकडून ‘समाचार’
सोशल मीडियावर शेअर केले व्यंगचित्र
वृत्तसंस्था/ अयोध्या
‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात अडकलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर लोकसभेच्या शिष्टाचार समितीशी असहमत व्यक्त केले आहे. त्यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी करणाऱ्या समितीने आपला अहवाल लोकसभा सभापतींना सादर केला आहे. याचदरम्यान माईत्रा यांनी एक व्यंगचित्र शेअर करत शिष्टाचार समितीच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली. मोईत्रा यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर एक व्यंगचित्र पोस्ट करत ‘आपण दुसऱ्या बाजूला असेपर्यंत नैतिकता राखा’ असे ट्विट केले आहे. आपल्या कथित गैरवर्तनाचा अहवाल स्वीकारणाऱ्या शिष्टाचार समितीवर थेट हल्ला म्हणून याकडे पाहिले जात आहे.
संसदेच्या शिष्टाचार समितीने शुक्रवारी ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणासंबंधी मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करावे असा शिफारस करणारा मसुदा अहवाल सभापती ओम बिर्ला यांना सादर केला. महुआ मोईत्रा यांनी गंभीर गैरवर्तन केल्याचा ठपका शिष्टाचार समितीने ठेवला आहे. तसेच त्यांना कठोर शिक्षा व्हावी असे मतही समितीतील सदस्यांनी व्यक्त केले आहे. या अहवालानंतर मोईत्रा यांनी शिष्टाचार समितीवरील टीका कायम सुरूच ठेवली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्यंगचित्रात मोईत्रा एका रिकाम्या खुर्चीजवळ बसलेल्या दिसत आहेत. रिकाम्या खुर्चीवर भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ रेखाटलेले आहे. तसेच मोईत्रा यांच्यासमोर ‘विरोधक’, तर रिकाम्या खुर्चीसमोर ‘सत्ताधारी’ असा नामफलक ठेवण्यात आला आहे.