6 दशलक्ष टन पोलादाची आयात होण्याचा अंदाज
मुंबई:
भारताने एप्रिल ते नोव्हेंबर या काळामध्ये एकंदर 4.26 दशलक्ष टन इतक्या तयार पोलादाची आयात केली असून आर्थिक वर्ष 2024 मध्ये मागणी चांगली असल्याकारणाने 6 दशलक्ष टनपर्यंत आयात पोहोचू शकते, असा अंदाज क्रिसील इंडिया या संस्थेने व्यक्त केला आहे. सध्याच्या काळामध्ये देशांतर्गत पातळीवर पोलादाची मागणी भक्कम राहिली आहे. हे पाहता यावर्षी वरील लक्ष गाठले जाईल, असे म्हणायला जागा आहे.
भारतात का वाढली मागणी?
अलीकडच्या महिन्यांमध्ये पोलादाच्या आयातीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर पाहता रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे पोलादाची मागणी काहीशी प्रभावित राहिली होती. पण या उलट भारतात मात्र पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे व एकंदरच रहिवासी व व्यावसायिक प्रकल्पांच्या वाढीव संख्येमुळे पोलादाची मागणी लक्षणीय राहिली आहे. भारतात पोलाद क्षेत्र सलग तिसऱ्या वर्षी दुहेरी संख्येने विकसित होताना दिसते आहे. 11 ते 13 टक्के इतकी वाढ या क्षेत्रात मागणीच्या बळावर पाहायला मिळते आहे. बांधकाम क्षेत्रातल्या वाढलेल्या हालचाली त्याचसोबत सरकारकडून पायाभूत सुविधांवर होणारा खर्च यायोगे पोलादाची मागणी सर्वोच्च स्तरावर राहिली आहे.
चीनमधून आयात वाढली
जानेवारी ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये चीनमधून पोलादाची निर्यात 35 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. सदरच्या देशातून भारताने 35.7 दशलक्ष टन पोलादाची आयात केल्याची माहिती मिळते आहे.