शांतता प्रस्थापित करणे संयुक्त जबाबदारी
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवी दिल्लीत आयोजित संयुक्त राष्ट्र सैन्यात योगदान देणाऱ्या देशांच्या प्रमुखांच्या संमेलनाला (यूएनटीसीसी) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संबोधित केले. भारतासाठी शांतता स्थापना कधीच एक पर्याय राहिलेला नाही, तर एक आस्थेचा विषय राहिला आहे. भारत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम राखण्याच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मिशनमध्ये त्याच्यासोबत ठामपणे उभा राहिला असल्याचे उद्गार राजनाथ यांनी काढले आहेत. शांतता स्थापना एक सैन्य मिशनपेक्षा अधिक मोठी असल्याचे आम्ही सर्व जाणतो, ही एक संयुक्त जबाबदारी आहे. याचमुळे युद्ध आणि अभावाने त्रस्त लोक ब्ल्यू हेल्मेट्सला पाहतात, तेव्हा त्यांना जगाने वाऱ्यावर सोडले नसल्याची जाणीव होत असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले.
सद्यकाळात काही देश उघडपणे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करत आहेत, तर काही देश आंतरराष्ट्रीय नियमांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काहीजण स्वत:चे नियम लादून स्वत:चा दबदबा निर्माण करू पाहत आहेत. या सर्वांदरम्यान भारत जुन्या आंतरराष्ट्रीय संरचनांमध्ये सुधारांचा पुरस्कार करत आंतरराष्ट्रीय नियम-आधारित व्यवस्थेला मजबुतीने कायम राखण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे वक्तव्य सिंह यांनी केले.
मागील दशकांमध्ये सुमारे 2,90,000 भारतीय कर्मचाऱ्यांनी 50 हून अधिक संयुक्त राष्ट्रसंघ शांतता स्थापना अभियानांमध्ये सेवा बजावली आहे आणि स्वत:च्या व्यावसायिक कौशल्य, साहस आणि करुणेसाठी जागतिक सन्मान मिळविला आहे. कांगो आणि कोरियापासून दक्षिण सुदान आणि लेबनॉनपर्यंत आमचे सैनिक, पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी लोकांचे रक्षण आणि समाजाच्या पुनर्निमाणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करत असल्याचे राजनाथ म्हणाले.
16 ऑक्टोबरपर्यंत संमेलन
180 हून अधिक भारतीय शांतिसैनिकांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ध्वजांतर्गत स्वत:च्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांचे साहस आणि निस्वार्थीपणा मानवजातीच्या सामूहिक अंतरात्म्यात अंकित असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले. हे संमेलन 16 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून यात 32 देशांचे वरिष्ठ सैन्याधिकारी एकाचवेळी उपस्थित राहणार आहेत.