धारवाडला स्वतंत्र मनपा स्थापन करा
धारवाड स्वतंत्र पालिका विकास मंचातर्फे मागणी
बेळगाव : धारवाड शहराला स्वतंत्र महापालिका नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे. शिवाय शासकीय योजनांसाठी नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे धारवाडला स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करावी, अशी मागणी गुरुवारी विधानसौध परिसरात धारवाड स्वतंत्र महानगरपालिका विकास मंचातर्फे आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे. धारवाड शहराची लोकसंख्या सुमारे साडेचार लाखांहून अधिक आहे. शिवाय इतरत्र लोकवस्ती वाढू लागली आहे. मात्र, हुबळी आणि धारवाडसाठी एकच महानगरपालिका असल्याने नागरिकांना अडचणी येऊ लागल्या आहेत. बळ्ळारी, विजापूर, तुमकूर, शिमोगा, दावणगेरे आदी ठिकाणी स्वतंत्र महानगरपालिका आहेत. मात्र, धारवाड आणि हुबळी या दोन्ही जुळ्या शहरांचे क्षेत्र अधिक असून देखील दोन्ही शहरांसाठी एकच महानगरपालिका आहे. त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. परिणामी धारवाड शहरातील विकासकामांवर परिणाम होऊ लागला आहे. मूलभूत सुविधा नागरिकांना मिळेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे धारवाडला स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केले आहे.