ईएसआयचा सर्व्हर बंद; रुग्णांची गैरसोय
हॉस्पिटलच्या कामकाजाबद्दल रुग्णांमध्ये नाराजी
बेळगाव : असून अडचण नसून खोळंबा, अशी ईएसआय हॉस्पिटलची अवस्था झाली आहे. या हॉस्पिटलच्या स्थलांतराबाबत चर्चा सुरूच आहे. परंतु सध्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे एकूणच या हॉस्पिटलच्या कामकाजाबद्दल रुग्णांमध्ये नाराजी पसरली आहे. ईएसआयमध्ये कोणत्याही स्वरुपाची शस्त्रक्रिया करावयाची असल्यास अर्ज भरावा लागतो. परंतु गेल्या आठ दिवसांपासून ईएसआयचा सर्व्हरच बंद आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली आहे. सर्व्हर कधी दुरुस्त होणार, याबाबत कोणालाच खात्री देता येत नाही.
वास्तविक ईएसआय रुग्णालय हे सर्वसामान्य व गरिबांसाठी आहे. परंतु कागदपत्रांची पूर्तता करताना प्रत्येकाचीच दमछाक होते. सध्या जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार कर्मचारी ईएसआयच्या सुविधेअंतर्गत येतात. त्यामुळे खरे तर या हॉस्पिटलमध्ये सर्व आधुनिक वैद्यकीय उपकरणे व सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने सर्व्हरपासूनच येथे समस्यांना सुरुवात होते. पर्यायी व्यवस्थासुद्धा उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत असून अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.