For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शंभर खाटांचे ईएसआय इस्पितळ उभारणार

12:04 PM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
शंभर खाटांचे ईएसआय इस्पितळ उभारणार
Advertisement

टेंडर प्रक्रियेला चालना : कामगारांच्या आरोग्यासाठी निर्णय : पेंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांची माहिती

Advertisement

बेळगाव : बेंगळूरनंतर सर्वाधिक कार्डधारक कामगार बेळगावात आहेत. सुमारे साडेतीन लाख कामगार ईएसआय कार्डधारक आहेत. त्यांचे हित जपण्यासाठी बेळगाव येथील 50 खाटांचे ईएसआय इस्पितळाचा दर्जा वाढवून ते 100 खाटांचे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी 152 कोटी रुपयांची टेंडर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती केंद्रीय कामगार व औद्योगिक राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली. रविवारी सकाळी अशोकनगर येथील ईएसआय इस्पितळाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली आहे. यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

ईएसआय इस्पितळाच्या कामाला लवकरात लवकर चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावातील औद्योगिक वसाहत मोठी आहे. पुणे व महाराष्ट्रातील इतर शहरांना औद्योगिक वस्तू पाठविल्या जातात. सुमारे साडेतीन लाख कार्डधारक कामगार आहेत. त्यांचे हित जपण्यासाठी ईएसआय इस्पितळाचा दर्जा वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या 50 खाटांचे इस्पितळ असूनही इमारत शिथिल अवस्थेत असल्यामुळे ते केवळ डे केअर सेंटर झाले आहे. 152 कोटी रुपयांची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

केवळ बेळगावच नव्हे तर देशभरात तज्ञ डॉक्टरांची कमतरता भासत आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढवण्यात वाढली आहे. डॉक्टर आहेत, मात्र तज्ञांची कमतरता भासत आहे. ईएसआय इस्पितळाची इमारत 1998 मध्ये उभारण्यात आली आहे. केवळ 25 वर्षात ही इमारत कशी जीर्ण झाली? याचा विचार करावा लागणार आहे.

याच जागेवर नवे इस्पितळ उभारायचे की औद्योगिक वसाहत परिसरात नव्या जागेवर इस्पितळ बांधकाम करायचे, याचा विचार सुरू आहे, असेही शोभा करंदलाजे यांनी सांगितले. बेळगाव येथील ईएसआय इस्पितळ सध्या रेफरल सेंटर झाले आहे. या इस्पितळात येणाऱ्या रुग्णांना अधिक उपचारासाठी इतर इस्पितळांना पाठवण्यात येते. त्यामुळे लवकरात लवकर इस्पितळाची कामे पूर्ण करण्याची गरज आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण होताच इस्पितळ कुठे उभारायचे, याचा निर्णय घेऊन कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे शोभा करंदलाजे यांनी सांगितले.

विनाविलंब भ्रष्टाचाराची प्रकरणे जाहीर करा

हिंमत असेल तर मंत्री भैरती सुरेश यांनी आपल्यासंबंधीची भ्रष्टाचाराची प्रकरणे जाहीर करावीत, असे आव्हान केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे यांनी सुरेश यांना दिले. पंधरा दिवसात शोभा करंदलाजे यांचे भ्रष्टाचार उघड करू, असे सुरेश यांनी सांगितले होते. विनाविलंब भ्रष्टाचाराची प्रकरणे जाहीर करा. मुडातील भ्रष्टाचारासंबंधी शेकडो फाईली पेटवण्यात आल्या आहेत. याविरुद्ध आपण आवाज उठवल्यामुळे आपल्याविरुद्ध अपप्रचार सुरू करण्यात आल्याचेही शोभा करंदलाजे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.