ईश्वरप्पा यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी
प्रतिनिधी/ बेंगळूर
शिमोगा लोकसभा मतदारसंघातून बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढविलेल्या माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांची भाजपमधून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. पण ईश्वरप्पा यांनी निवडणूक रिंगणातून मागे न हटल्याने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करत 6 वर्षांसाठी ईश्वरप्पा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून शिमोगा लोकसभा मतदारसंघातून बंडखोर उमेदवार म्हणून ईश्वरप्पा यांनी निवडणूक लढवली आहे. त्यामुळे हा पक्षशिस्तीचा भंग आहे. परिणामी, त्यांची तात्काळ प्रभावाने सर्व जबाबदारीतून मुक्तता करण्यात आली असून त्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, असे भाजपचे राज्य शिस्तपालन समितीचे अध्यक्ष लिंगराज पाटील यांनी हकालपट्टी आदेशात म्हटले आहे.
विजय होऊन पुन्हा भाजपमध्ये करणार प्रवेश
आपण अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हापासून आतापर्यंत तेच सांगत आलो आहे. पक्षातून हकालपट्टी झाल्याबद्दल मला कोणतेच पत्र आलेले नाही. मी कोणत्याही हकालपट्टीला घाबरणार नाही. यंदाची लोकसभा निवडणूक लढवून विजय मिळवत पुन्हा भाजपमध्येच प्रवेश करेन.
-के. एस. ईश्वरप्पा, भाजप बंडखोर उमेदवार