तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार ईशा
हीरो-हीरोइन’ चित्रपटात साकारणार भूमिका
देओल परिवारातील कलाकार चित्रपटसृष्टीत अत्यंत सक्रीय आहेत. बॉबी देओल अॅनिमलनंतर अन्य अनेक चित्रपटांचा हिस्सा आहे. त्याचा मोठा बंधू सनी देओलने देखील गदर 2 द्वारे जोरदार पुनरागमन केले असून त्याच्या बॉर्डर 2 या चित्रपटाची घोषणा झाली आहे. अभिनेत्री ईशा देओल देखील मागील काही वर्षांमध्ये सक्रीय दिसून येत आहे. 2021 मध्ये तिने ‘एक दुआ’ हा लघूपट केला होता. तर 2022 मध्ये ‘रुद्र’ आणि 2023 मध्ये ‘हंटर’मध्ये ती दिसून आली होती. ईशा आता लवकरच तेलगू चित्रपटसृष्टीत ‘हीरो-हीरोइन’ चित्रपटाद्वारे पदार्पण करणार आहे.
माझ्या मनात दक्षिणेबद्दल नेहमीच एक खास स्थान राहिले आहे. हीरो-हीरोइन या चित्रपटात मोठ्या प्रमाणावर रोमान्स आहे. ही एक अत्यंत जिवंत आणि नवी प्रेमकहाणी आहे. तेलगू चित्रपटसृष्टी सध्या वेगाने विकसित होत असून येथे काम करण्याची हीच सर्वात योग्य वेळ असल्याचे ईशाने म्हटले आहे.
अभिनय हाच माझा ध्यास आहे. यापूर्वी मी साकारलेल्या भूमिका एक प्रकारच्या होत्या. परंतु आता काळ बदलला आहे. नवया प्रकारचे चित्रपट तयार केले जात असून भूमिकांमध्ये वैविध्य दिसून येऊ लागले आहे. स्वत:साठी सर्वोत्तम भूमिका शोधण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असल्याचे ईशाने म्हटले आहे.