प्रश्नपत्रिकेत भाषांतरात त्रुटी : फेरपरीक्षा घ्या!
मुख्यमंत्र्यांनी केपीएससीला सूचना : दोन महिन्याची मुदत
प्रतिनिधी/ बेंगळूर
नुकत्याच झालेल्या कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या (केपीएससी) पूर्वपरीक्षेत भाषांतरात त्रुटी आढळून आल्याने राज्य सरकारविरुद्ध उमेदवारांसह अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केपीएससीला 2 महिन्यांच्या आत फेरपरीक्षा घेण्याची सूचना केली आहे.
कर्तव्यात कसूर केलेल्या अधिकाऱ्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. आगामी परीक्षा जबाबदारीने आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील. भरती प्रक्रियेची पारदर्शकपणा आणि विश्वास अबाधित राखून उमेदवारांचे हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असा उल्लेख मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये केली आहे.
27 ऑगस्ट रोजी कर्नाटक लोकसेवा आयोगाने राज्यभरात 384 गॅझेटेड प्रोबेशनरी पदांसाठी पूर्वपरीक्षा घेतली होती. प्रश्नपत्रिकेत प्रश्नांचा कन्नडमध्ये भाषांतर करताना अनेक त्रुटी दिसून आल्या होत्या. त्यामुळे मातृभाषेतून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अनेक प्रश्न सोडविणे कठीण झाले. केपीएससीच्या गलथान कारभारामुळे उमेदवार, अनेक संघ-संस्था, साहित्यिकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. तसेच फेरपरीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली होती. प्रश्नपत्रिकेचे फोटो देखील व्हायरल करण्यात आले.
इंग्रजीतील प्रश्नांमध्ये चुकीचे उत्तर निवडा, असे विचारण्यात आले तर कन्नडमध्ये त्याच प्रश्नात योग्य पर्यायी उत्तर निवडण्यास सांगण्यात आले. त्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे केपीएससीच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त झाला होता. कन्नड विकास प्राधिकरणाने यासंबंधी केपीएससीकडे विचारणाही केली होती.
यासंबंधी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी सोशल मीडियावरील ‘एक्स’ हॅन्डलवर केपीएससीच्या कन्नड भाषांतरातील त्रुटींमुळे सर्व उमेदवारांना न्याय देण्यासाठी 2 महिन्यांच्या आत फेरपरीक्षा घेण्याची सूचना केपीएससीला दिली आहे. आगामी परीक्षेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचीही सूचना त्यांनी केली आहे.