कारवार येथील रविंद्रनाथ टागोर समुद्रकिनाऱ्याची धूप
किनारपट्टीवर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे समुद्राला उधाण : मच्छीमारी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण
कारवार : गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यांना झोडपून काढणाऱ्या पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. पावसामुळे हैराण झालेल्या किनारपट्टीवासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तथापि आता किनारपट्टीवरील तालुक्यांना समुद्राच्या धूपची समस्या भेडसावीत आहे. त्यामुळे किनाऱ्यालगत वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांत विशेष करून मच्छीमारी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतितास 30 ते 40 कि. मी. किंवा त्याहून अधिक प्रमाणात किनारपट्टीवर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे समुद्राला उधाण आले आहे. समुद्र प्रचंड खवळला आहे. किनाऱ्याकडे उंच झेपावणाऱ्या लाटामुळे जिल्ह्याच्या सुमारे 150 कि.मी. लांबीच्या किनारपट्टीवर ठिकठिकाणी या समस्येने डोके वर काढले आहे. अंकोला तालुक्यातील हारवाड येथील तरंगामेट येथे यापूर्वीच समुद्रधूपमुळे मोठी हानी झाली आहे.
आता रविंद्रनाथ टागोर समुद्रकिनाऱ्यावर धूप समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. येथील ऐतिहासिक लंडनब्रिजपासून हाकेच्या अंतरावर समुद्र धूपमुळे मोठी हानी होत आहे. येथे लाखो रुपये खर्च करून होड्या, जाळी आणि इतर साहित्य ठेवण्यासाठी मोठे शेड उभारले होते. हे शेड लाटांनी उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या हंगामात होड्या जाळी किंवा अन्य साहित्य ठेवायचे तरी कुठे असा प्रश्न मच्छीमारी बांधवासमोर पडला आहे. मासळीचा हंगाम दोन-तीन दिवसांवर (1 ऑगस्ट) येऊन ठेपल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे होड्यांची डागडुजी, रंगरंगोटी करायची कशी, असा प्रश्न मच्छीमारांना भेडसावीत आहे. गेल्या काही वर्षात येथील समुद्राने सुमारे 500 मीटर घुसखोरी केल्याचे सांगण्यात आले. पाच-सहा दिवसांपूर्वी महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांनी किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात येईल, असे सांगितले आहे.