आनंदला धक्का देत जेरुसलेम मास्टर्समध्ये एरिगेसी विजेता
वृत्तसंस्था/जेरुसलेम
ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने पाच वेळचा विश्वविजेता असलेल्या विश्वनाथन आनंदला अंतिम फेरीत पराभवाचा धक्का देत जेरुसलेम मास्टर्सचे विजेतेपद पटकावले. या दोघांनी सुरुवातीच्या रॅपिड गेममध्ये बरोबरी साधल्यानंतर, एरिगेसीने पहिल्या ब्लिट्झ टायब्रेक सामन्यात पांढऱ्या मोहरांनी खेळताना विजय मिळवत निर्णायक आघाडी घेतली. 22 वर्षीय खेळाडूने दुसऱ्या ब्लिट्झ सामन्यातही विजयी स्थिती राखली आणि नंतर बरोबरी साधली, जी त्याला 2.5-1.5 असा सामना जिंकून जेतेपद मिळवण्यासाठी पुरेशी होती. ‘ही लढत सोपी नव्हती. त्यात अनेक आव्हाने होती. तशात माझा खेळही सर्वोत्तम नव्हता. तरीही मी ते पार करू शकलो याचा मला आनंद आहे,’ असे अर्जुनने विजेतेपद जिंकल्यानंतर सांगितले.
‘आज, दोन्ही सामने (पीटर स्विडलर विरुद्ध आणि नंतर आनंद) खूप तणावपूर्ण होते. आनंद सरांविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आम्ही दोघांनीही आमच्या संधी गमावल्या. पण ब्लिट्झमध्ये, मला वाटते की मी खूप चांगला खेळलो,’ असे तो पुढे म्हणाला. पांढऱ्या मोहरांनी खेळण्याचा फायदा असूनही अंतिम सामन्यात गेम 1 वरील नियंत्रण गमावल्याबद्दल एरिगेसी म्हणाला की, चूक झाल्यानंतर तो काळजीत होता परंतु तो सावरण्यात यशस्वी झाला. ‘खेळादरम्यान मी खूप काळजीत होतो. मला माहित होते की मी त्यात चूक केली आहे. म्हणून, मी निश्चितच काळजीत होतो. पण ठीक आहे, मला फक्त परत लढायचे होते आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करत होतो,’ असेही तो म्हणाला.
विजयासह, एरिगेसीने 55,000 डॉलर्स जिंकले तर आनंदने 35,000 डॉलर्स जिंकले. अर्जुनने त्याच्या शेवटच्या चार टप्प्यातील सामन्यात रशियन ग्रँडमास्टर पीटर स्विडलरला हरवले होते तर आनंदने उपांत्य फेरीत जागतिक ब्लिट्झ चॅम्पियन लॅन नेपोमनियाचीचा पराभव केला होता. स्विडलरने तिसऱ्या स्थानाच्या प्लेऑफमध्ये देशबांधव नेपोमनियाचीचा 2.5-1.5 असा पराभव केला. जेरुसलेम मास्टर्स ही निवडक 12-खेळाडूंची राउंड-रॉबिन स्पर्धा आहे. ज्यामध्ये आघाडीचे चार खेळाडू प्लेऑफमध्ये खेळतात.