इनव्हायरोचा आयपीओ 22 नोव्हेंबरला होणार खुला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इनव्हायरो इन्फ्राचा 22 नंबर रोजी आयपीओ खुला होणार असून या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 650 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनी एकूण 4,39,48,000 समभाग सादर करणार आहे. यामध्ये 3,86,80,000 इतके नवे ताजे समभाग सादर केले जाणार आहेत.
इनव्हायरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेड यांचा आयपीओ 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर यादरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. 650 कोटी रुपयांचा आयपीओ असणार असून 140-148 रुपये प्रति समभाग अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 101 समभाग असतील गुंतवणूकदारांना कमीत कमी 14 हजार 948 रुपये गुंतवावे लागणार आहेत. 29 नोव्हेंबर रोजी बीएसई आणि एनएसई निर्देशांकांवर समभाग सूचीबद्ध होणार आहेत.
कंपनीने गेल्या तीन सलग आर्थिक वर्षांमध्ये नफ्यामध्ये चांगली कामगिरी नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये 225 कोटी रुपये उत्पन्न आणि 34 कोटी रुपये निव्वळ नफा, आर्थिक वर्ष 2023 मध्ये 341 कोटी रुपये उत्पन्न आणि 55 कोटी रुपये निव्वळ नफा कंपनीने कमावला होता. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 207 कोटी रुपयांचे उत्पन्न आणि 29 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.